पुढारी ऑनलाईन डेस्क - एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली झलक भेटीला आणलीय. ‘ मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘ ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे दिग्दर्शक सतीश राजवाडे एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाब्रिया यांच्यासह घेऊन येत आहेत. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल? असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे. प्रेम आणि नशीबाची ही जादुई सफर पाहाणं नक्कीच मनोरंजक ठरेल. या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनेत्री ऋचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात दिसेल. प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळेल.
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणणं आमच्यासाठी खूप खास आहे. प्रेमाचा रंग आणखी गडद करणारी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना प्रेमाचा एक नवा अनुभव देईल. या चित्रपटात प्रेमाची जादू आणि तंत्रज्ञानाचा मिलाप असल्याने प्रेक्षकांना प्रेमाचा हा प्रवास नक्कीच आवडेल.”
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ प्रेमकथा सर्वांच्याच आठवणीतल्या असतात. त्या काळाच्या पलीकडे ही टिकतात. मी याआधी ही काही प्रेमकथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही माझी सातवी प्रेमकथा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली अतिशय आधुनिक प्रेमकथा आजच्या पिढीला नक्कीच आवडेल. ललित, ऋचा आणि रिधिमा यांचा अभिनय आणि अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटाला खास रंगत आणेल. चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये प्रेम आणि नशीबाच्या खेळाची झलक पाहून प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत.”
चित्रपटाचे सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या जून २०२५ मध्ये अनुभवायला मिळेल.