Dev Khel Web Series Controversy Pudhari
मनोरंजन

Dev Khel Controversy: प्राजक्ता माळीच्या 'देव खेळ'वरून विधानसभेत खळबळ; आशिष शेलारांचा कारवाईचा इशारा; नेमका वाद काय?

Dev Khel Web Series Controversy: अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या 'देव खेळ' वेब सिरीजवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत असून हा मुद्दा विधानसभेतही गाजला.

पुढारी वृत्तसेवा

Dev Khel Web Series Controversy: अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'देव खेळ' ही वेब सिरीज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सिरीजच्या टीझरमध्ये कोकणातील श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शंकासूर देवतेचे चित्रण आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची दखल थेट विधानसभेत घेण्यात आली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणावर विधानसभेत भूमिका स्पष्ट करत संबंधित वेब सिरीजविरोधात पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.

नेमका वाद काय आहे?

'देव खेळ' या सात भागांच्या वेब सिरीजच्या टीझरमध्ये कोकणातील लोकपरंपरा आणि शंकासूर या श्रद्धास्थानाचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत कोकणातील अनेक नागरिक, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी या वेब सिरीजला विरोध दर्शवला. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.

विधानसभेत आशिष शेलार काय म्हणाले?

विधानसभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "शंकासूर ही केवळ लोककलेतील व्यक्तिरेखा नसून अनेकांसाठी श्रद्धेचा विषय आहे. लोकपरंपरेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याची परंपरा वेगळी आहे, मात्र श्रद्धास्थानाचा विपर्यास होणार असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही."

त्यांनी पुढे सांगितले की, या संदर्भात अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची निवेदने प्राप्त झाली असून, या प्रकरणात पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच या विषयाची माहिती केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयालाही देण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

कारवाईचे आदेश

आशिष शेलार यांनी यापूर्वीही या वेब सिरीजविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. आता विधानसभेत त्यांनी लोकपरंपरेचा विपर्यास झाल्याचा आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

'देव खेळ'मध्ये कोणते कलाकार आहेत?

दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सात भागांच्या वेब सिरीजमध्ये अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, वीणा जामकर, ओंकार भोजने, मंगेश देसाई यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता

या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर प्रतिक्रिया उमटत असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या वादावर वेब सिरीजचे निर्माते किंवा संबंधित कलाकारांकडून कोणतीही अधिकृत भूमिका समोर आली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT