पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेते आणि लेखक पोसानी कृष्णा मुरली यांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हैदराबादमधील येल्लारेड्डीगुडा येथील न्यू सायन्स कॉलनीजवळील त्याच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बुधवारी, प्रसिद्ध तेलुगू चित्रपट अभिनेते आणि लेखक पोसानी कृष्णा मुरली यांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. अन्नमय्या जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बी.कृष्णा राव यांनी पीटीआयला सांगितले की, कृष्णा मुरली यांना रात्री ८.४५ वाजता हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी हैदराबादमधील येल्लारेड्डीगुडा येथील न्यू सायन्स कॉलनीजवळील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, कृष्णा मुरली यांच्या पत्नीला बजावण्यात आलेल्या नोटिशीनुसार , त्यांना बीएनएस कलम १९६, ३५३ (२) आणि १११ सह ३ (५) तसेच बीएनएसएस कलम ४७ (१) आणि (२) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या अटकेबाबत पोलिसांकडून अद्याप अधिक स्पष्टीकरण मिळालेले नाही.
नोटीसनुसार, अभिनेत्याला अजामीनपात्र कलमांखाली अटक करण्यात आली आहे. सांबेपल्ली उपनिरीक्षकांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, "कृष्णा मुरली यांना ज्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे तो अजामीनपात्र आहे. त्याला अतिरिक्त न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, राजमपेट यांच्यासमोर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
कृष्णा मुरली हे वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीशी संबंधित होते. मागील वायएसआरसीपी सरकारच्या काळात त्यांनी आंध्र प्रदेश चित्रपट, टीव्ही आणि थिएटर विकास महामंडळ (एपीएफटीटीडीसी) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.