मुंबई : Poorvi Bhave Poem : सोशल मीडियावर सध्या बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेवर जोरदार चर्चा सुरू आहे. ही कविता पूर्वी भावे यांची आहे. त्या प्रसिद्ध निवेदक, नृत्यांगना आहेत. त्यांनी इयत्ता तिसरीला असताना ही कविता लिहिली होती. पण या कवितेत काही इंग्रजी शब्दांचा वापर केल्यामुळे सध्या त्यावर टीका होत आहे.
फेसबुकवर श्रेनिक नरदे यांनी म्हटलंय की, मूळात कविता ही भानगड काहीही असो. पण मोरांबद्दल लहानपणापासून गैरसमजात पोरंपोरी वाढतात. त्यामुळे मोराला पिल्लं हि पावसामुळे होतात अश्रुमुळे होतात असे गैरसमज समाजात मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. मोर काय खुळा आहे का उगचच नाचायला. त्याला परत वन्स मोअर करायची काही गरज नव्हती. मग जमलेले बाकीचे लांडोर होते असा अर्थ होतो.
नरदे यांच्या पोस्टवर अद्वैत मेहता यांनी कमेंट करून ‘ये दिल मांगे मो (अ) र.. वन्स मो ‘अ’ र... वसंत more.. नाच रे मोरा आंब्याच्या वनात.. मोर-dj डॉल्बी लाव मग नाचतो,’ असा टोल लगावला आहे.
रोहन नामजोशी या युजरने कवितेवर शेलक्या शब्दात भाष्य केले आहे. तसेच कवयत्री पूर्वी भावे यांना अप्रत्यक्षपणे टीकाही केली आहे. ते म्हणातात की, सर्वप्रथम या कवितेच्या कवयित्री पूर्वी भावे यांचे हार्दिक अभिनंदन. त्यानी मराठीच्या कैवाऱ्यांना एक विषय चघळायला दिला. 27 फेब्रुवारीला एक वार्षिक अरण्यरुदन सोहळा होतोच मराठी भाषेबद्दल. या वर्षात तो दोनदा होईल. हरकत नाही. काय सुंदर कविता आहे ही व्वा,, कवितेतल्या मोराने वन्समोअर सुद्धा दिला आहे. मराठी साहित्यात अजरामर ठरणारी ही कविता. तुम्हाला मेलं कौतुकच नाही’, असा टोला लगावला आहे.
ते पुढे म्हणतात, आता दिवाळी पहाट आणि तत्सम गाण्याच्या कार्यक्रमांना जाता आणि श्रावणात घननीळा वगैरे गाण्यांना 'वन्स मोर वन्स' मोर अशी दाद देता. मग 'जंगलात ठरलेल्या मैफिलीत' दाद दिलीत तर तुमच्या पोटात का दुखतंय इतकं? वन्स मोर इंग्रजी शब्द म्हणून. रोजच्या जगण्यात इतके इंग्रजी शब्द बोलता तेव्हा बरा पुळका येत नाही. हे पहिलीत शिकणारे कार्ट शाळेत येण्यापूर्वी 'बेबी शार्क टुडुटुडु' हे गाणं शिकतात तेव्हा कौतुकाचे सोहळे करतात. त्या गाण्याला तरी काय अर्थ आहे तसं पाहिलं तर? आमच्या पूर्वीताईंनी मराठीत लिहिलं तर मिरच्या झोंबल्या, अशी खिल्ली उडवली आहे.
‘मुळात ही कविता अतिशय भंगार आहे. 'स्वप्नात पाहिली राणीची बाग' या विंदांच्या कवितेला समोर ठेवून रचल्यासारखी वाटतेय. पहिल्या ओळीत लिहिलंय ही हत्तीची अक्कल.. बहुतेक सुबुद्धी म्हणायचं असेल कवयित्रीला. कारण वाचताना.. ही ही.. हत्तीची अक्क्ल असं वाटतंय (म्हणून बघा एकदा). ‘तबल्यावर होती कोल्होबाची साथ, वाघोबा म्हणाले नाही ना बात?' म्हणजे. कहना क्या चाहते हो? म्हणजे नीट जमलं नाही असं म्हणायचं असेल. बात हिंदी शब्द हा भाग आणखी वेगळा. क्या बात है पूर्वी ताई. पुढे जाऊन आधुनिक दुर्बोध कवयित्री होणार तुम्ही’, असा टोला लगावला आहे.
‘पण खरं सांगायचं तर भावे बाईंची तरी काय चूक म्हणा. एक तर आपल्याकडे कवी-कवयित्री नाहीत. कवी आहेत म्हटल्यावर लोक त्यांची थट्टा करतात. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठीत काहीतरी लिहिणार म्हणजे कवयित्रीला मानधन देताना बालभारतीला फेफरे आले असणार. आपल्याला दर्जेदार साहित्य हवं असतं पण दर्जेदार पैसे द्यायचे नसतात. मग तुमच्या वाट्याला हेच येणार. म्हणजे कमी पैसे घेतले म्हणजे घाण लिहायचं असा त्याचा अर्थ नाही. पण का लोक क्रिएटिव्ह होतील?’, असा सवाल नामजोशी यांनी उपस्थित केला आहे.
‘सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कवितेला मान्यता देणाऱ्यांची कीव येते. भावे बाई काही लिहितील, तुम्ही मान्य कसं करता? पुन्हा मामला तोच. जे नीट लिहितात किंवा लिहू पाहतात त्यांना नीट वागवायचं नाही, संधी द्यायची नाही, त्यांचा मान नाही धन त्याहून नाही. मग हेच तुमच्या पोरांना वाचायला लागणार. देत रहा वन्स मोअर...’ असा सल्लाही नामजोशी यांनी दिला आहे.
राजेश कदम म्हणातात, भावे आडनाव बघितल्यामुळे त्या कवितेच ट्रोलिंग सुरू आहे. उगाच कोणाच्याही अजेंडात वाहवत जाऊ नका. जातीयवाद्यांनी केलेल्या चिखलात लोळू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत’, या फेसबुक ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी या कवितेचे छायाचित्र पोस्ट केले आहे. ते म्हणतात की, ‘हे आहे महाराष्ट्र शासनाचे बालभारतीचे इयत्ता पहिलीचे पुस्तक! कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे ‘वन्स मोर वन्स मोर झाला शोर…’ किमान मराठी भाषा शिकवताना तरी मराठी शब्द वापरायला हवेत, असे वाटत नाही का? तुमचे मत काय?” त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर या कवितेचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.