Dhurandhar The Revenge Atiq Ahmed Story Controversy : एकीकडे 'धुरंधर-२' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत असतानाच, दुसरीकडे या चित्रपटावरून आता राजकीय कलगीतुरा रंगला आहे. चित्रपटातील 'आतिफ अहमद' या पात्राच्या चित्रणावर समाजवादी पक्ष (सपा), काँग्रेस आणि एआयएमआयएम (AIMIM) या पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर-२' प्रदर्शित होताच सिनेगृहांमध्ये तुफान गर्दी खेचत आहे. पहिल्याच दिवशी १४५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई करून या चित्रपटाने इतिहास रचला आहे. मात्र, या यशासोबतच चित्रपटाने एका मोठ्या राजकीय वादालाही तोंड फोडले आहे.
या चित्रपटात समाजवादी पक्षाचे माजी खासदार आणि बाहुबली नेते अतीक अहमद यांच्याशी साधर्म्य असलेले एक पात्र दाखवण्यात आले आहे. चित्रपटात या पात्राचे नाव 'आतिफ अहमद' असे आहे. कथानकानुसार, आतिफ अहमदचे पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय' (ISI) आणि 'लष्कर-ए-तैयबा'शी संबंध असल्याचे चित्रित करण्यात आले आहे.
या पाकिस्तानी कनेक्शनद्वारे तो भारतात बनावट नोटांच्या पुरवठ्यात सामील असल्याचे दाखवले आहे. इतकेच नव्हे तर, पाकिस्तानच्या मदतीने उत्तर प्रदेशात 'पाकधार्जिणे सरकार' स्थापन करण्याचा कट रचल्याचा खळबळजनक प्रसंगही चित्रपटात गुंफण्यात आला आहे.
'आतिफ अहमद'च्या माध्यमातून अतीक अहमद यांचे चित्रण करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे नेते एसटी हसन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘चित्रपटाची कमाई वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक असे कृत्य करण्यात आले आहे. असे लोक कोणाचीही बदनामी करू शकतात. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र जेव्हा यावर जाब विचारला जाईल, तेव्हा हे पात्र काल्पनिक असल्याचे सांगून वेळ मारून नेली जाईल.’
एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनीदेखील यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, ‘‘मुस्लिम समाजाची बदनामी करण्यासाठीच 'धुरंधर-२'ची निर्मिती करण्यात आली आहे. देशात द्वेष पसरवण्याच्या षडयंत्राचा भाग म्हणून अशा प्रकारचे चित्रपट बनवले जातात. याआधीही अनेक 'प्रोपोगंडा' चित्रपट आले आहेत. चित्रपट निर्मात्यांना समाजावर होणाऱ्या परिणामांची पर्वा नसून, केवळ पैसा कमावण्यासाठी खोटेपणा आणि द्वेष विकला जात आहे.’’
काँग्रेस नेत्यांनीही या चित्रपटाबाबत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नेते राशिद अल्वी म्हणाले की, ‘‘या चित्रपटाची जितकी निंदा करावी तितकी कमी आहे. काय या चित्रपटाच्या माध्यमातून रस्त्यावर लोकांवर गोळ्या झाडण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन दिले जात आहे?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.