प्रसिद्ध अभिनेते, गायक, गीतकार, लेखक पीयूष मिश्रा सध्या त्यांच्या व्यावसायिक कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या वैयक्तिक संघर्षावर उघडपणे भाष्य केले. आपल्या लग्नाबद्दल बोलताना त्यांनी आयुष्यातील एका अत्यंत कठीण टप्प्याचा उल्लेख केला. यामध्ये भावनिक दुरावा आणि स्वतःला शोधण्याच्या प्रक्रियेचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
पीयूष मिश्रा यांनी अत्यंत प्रांजळपणे कबूल केले की, विवाहित असतानाही त्यांचे दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक गुंतागुंती निर्माण झाल्या होत्या. त्यांनी आपल्या 'तुम्हारी औकात क्या है, पीयूष मिश्रा' या नव्या पुस्तकात वैवाहिक आयुष्यातील वादळांविषयी अत्यंत मोकळेपणाने भाष्य केले आहे. मुलाखतीत त्यांनी पती म्हणून आपली भूमिका, पत्नी प्रियासोबतचे नाते आणि काळासोबत स्वतःमध्ये झालेले बदल यावर सविस्तर संवाद साधला.
शुभंकर मिश्रा यांच्याशी संवाद साधताना पीयूष मिश्रा यांनी कबुली दिली की, सुरुवातीच्या काळात ते एक आदर्श पती सिद्ध होऊ शकले नाहीत. ते म्हणाले, "आता मी एक चांगला पती आहे, पण पूर्वी तसा नव्हतो. त्यावेळी माझ्याकडे जबाबदारीची जाणीव नव्हती, तर लग्न ही एक फार मोठी जबाबदारी असते. विशीत जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा त्याला कोणताही तर्क नसतो आणि तेच त्या वयातील प्रेमाचे सौंदर्य असते. मात्र, वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करता, जी तुमच्यासोबत वृद्धत्व स्वीकारण्यास तयार असते. माझ्या पत्नीने माझ्यासोबत म्हातारे होणे स्वीकारले, याच गोष्टीतून प्रेमाची खरी व्याख्या स्पष्ट होते."
पीयूष मिश्रा यांनी एक धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, वैवाहिक नात्याचा स्वीकार करायला त्यांना तब्बल १५ वर्षे लागली. "ती माझी पत्नी आहे, हे समजायला मला दीड दशक लागले. त्याआधी ती माझ्यासाठी केवळ मुलांची आई आणि घर सांभाळणारी एक स्त्री होती. त्यापलीकडे तिच्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही भावना नव्हत्या," असे त्यांनी प्रांजळपणे नमूद केले.
स्वतःचा स्वभाव अत्यंत रुक्ष आणि असामाजिक असल्याचे सांगताना पीयूष यांनी आपल्या विस्कळीत नात्याचे श्रेय पत्नी प्रियाच्या धैर्याला दिले. त्यांनी आठवण करून दिली की, "तिचे माझ्यावर निस्सीम प्रेम होते. माझ्यासाठी तिने घरादाराचा त्याग केला आणि पालकांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न केले. ती मला कधीच सोडून जाणार नाही, या शब्दाला ती जागली." पत्नीच्या या त्यागाचे स्मरण करताना मिश्रा भावूक झाले होते.
जेव्हा त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी विलंब न लावता पत्नीसमोर सर्व गुपिते उघड केली. "मी तिला सर्व काही सांगितले आणि तिची माफी मागितली. त्यावेळी आम्ही दोघेही ढसाढसा रडलो आणि एकमेकांना मिठी मारली. त्या कबुलीमुळे मन हलके झाले," असे त्यांनी सांगितले. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील आणि नात्यातील एक महत्त्वाचे वळण ठरला. आज आपल्या पत्नीच्या मोठेपणामुळेच आपण एकत्र आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.