‘मु.पो.बोंबिलवाडी' चित्रपट भेटीला येणार आहे Instagram
मनोरंजन

परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी घेऊन येत आहेत ‘मु.पो.बोंबिलवाडी'

मोशन पोस्टर प्रदर्शित करत नवीन चित्रपटाची केली घोषणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांनी त्यांचा नवीन चित्रपट ‘मु.पो. बोंबिलवाडी’ची घोषणा केलीय. चित्रपट २५ डिसेंबर २०२४ रोजी रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजन असून चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करून चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी यांच्या गतवर्षी चित्रपटगृहांमध्ये धमाल उडवून देणाऱ्या ‘वाळवी’ला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ‘नाच गं घुमा’लाही यंदा प्रचंड प्रतिसाद मिळविला. हरीश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, चि सौ कां, आत्मपॅम्प्लेट यांसारख्या त्याधीच्या दर्जेदार व गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. आता परेश आणि मधुगंधा यांनी त्यांच्या ‘मु.पो.बोंबिलवाडी- १९४२ एका बॉम्बची बोंब’ची घोषणा केली आहे.

मोशन पोस्टरवरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, असा अदमास रसिकांना बांधता येतो. बॉम्बच्या पुंगळीतून हिटलरचा चेहरा बाहेर येताना दिसतो. या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी म्हणाले, “मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक लोकांना इतके आवडले की तो माझ्यासाठी एक धक्का होता! बोंबिलवाडीसारख्या छोट्या गावात इंटरनॅशनल घटना घडतात आणि त्यावर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा निकाल लागतो ही फार्सिकल गोष्ट आजही तितकाच व्यायाम देईल फुप्फुसांना! काम सुरू झालंय!.”

चित्रपटाची निर्माती मधुगंधा कुलकर्णी या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाल्या, “मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ हे नाटक मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा माझी हसून हसून पुरेवाट झाली होती. त्यावेळी मला वाटले की याचा चित्रपट किती उत्तम होईल. मी जेव्हा आमच्या इतर चित्रपटांच्या प्रमोशनला जायचे तेव्हा वेगवेगळ्या वयोगटातील खूप सारे प्रेक्षक म्हणजे अगदी तिशीपासून सत्तरीपर्यंतचे प्रेक्षक आम्हाला सांगायचे की, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ आणा ना परत. ते सांगायचे की, त्या नाटकाने त्यांना खूप हसवले आहे. मला आश्चर्य वाटायचे की, लोकांना इतक्या वर्षांनंतर या नाटकाच्या स्मृती आहेत आणि त्यांना इतक्या वर्षानंतर खूप हसलो, हे आठवतंय.”

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT