पुढारी ऑनलाईन डेस्क : Paatal Lok Season 2 Trailer : अभिनेता जयदीप अहलावतच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेल्या 'पाताल लोक 2' चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. हाथीराम चौधरीच्या भूमिकेत जयदीप अहलावत खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो नागालँडमधील एका हत्येचे गूढ उकलताना दिसणार आहे. ज्याचे धागे पहिल्या सीझनच्या पात्रांशी जोडले गेले आहेत. यावेळी ‘पाताल लोक’चे जग किती वेगळे आणि सस्पेन्सने भरलेले असेल ते जाणून घेऊया.
‘पाताळ लोक 2’ चा ट्रेलर क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला आहे. ट्रेलरची सुरुवात एका खास कथनाने होते. यानंतर नागालँडमधील एका बड्या व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे, ज्याची उकल करण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर देण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये, मालिकेचा नायक जयदीप अहलावत इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीच्या भूमिकेत हत्येचे नवीन गूढ उकलताना दिसणार आहे. या प्रवासात त्याला अनेक अडचणींचाही सामना करावा लागणार आहे. नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि हत्या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी हथीरामला नागालँडला जावे लागणार आहे.
समाजातील वाईट गोष्टी दूर करण्याच्या लढाईत तो आपले सर्वस्व देताना दिसणार आहे. पण हथीरामसमोर आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप गडबड सुरू आहे. कुटुंबीयांना त्याच्या सुरक्षिततेची चिंता आहे. या सर्वांचा समतोल साधताना हथीराम सत्याचा शोध कसा लावेल, ही त्याच्यासाठी कठीण परीक्षा आहे, जी पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असेल.