Nora Fatehi Sarke Chunar Teri Sarke: आगामी चित्रपट KD: The Devil मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यामुळे अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. काही प्रेक्षकांनी या गाण्यातील बोल आणि नृत्याविषयी आक्षेप घेत अतिशय अश्लील आणि दुहेरी अर्थ असल्याची टीका केली आहे.
हे गाणे दिग्दर्शक प्रेम यांच्या KD: The Devil या पॅन-इंडिया अॅक्शन चित्रपटातील आहे. या चित्रपटात ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही डान्स बारसारख्या सेटवर अनेक बॅकअप डान्सर्ससह दमदार नृत्य करताना दिसत आहे. या गाण्यात अभिनेता संजय दत्त याचीही झलक पाहायला मिळते.
गाण्याचे बोल प्रसिद्ध झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली. काही प्रेक्षकांनी गाण्यातील ओळींमध्ये दुहेरी अर्थ असल्याचा आरोप केला. तसेच गाण्यातील काही दृश्ये आणि नृत्याच्या हालचाली अत्यंत सूचक असल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात आली. विशेषतः नोरा फतेहीची ‘हूक स्टेप’ अनेकांना खटकली.
सोशल मीडियावर या गाण्याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहत्यांनी नोरा फतेहीच्या नृत्यकौशल्याचे आणि स्टेज प्रेझेन्सचे कौतुक केले, तर अनेकांनी या गाण्याला “अतिशय भडक” असल्याची टीका केली. काही युजर्सनी विनोदी प्रतिक्रिया देत हे गाणे भोजपुरी गाण्यांपेक्षाही जास्त धाडसी असल्याचेही म्हटले.
वादाच्या पार्श्वभूमीवरही हे गाणे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. हे गाणे गायिका मांगली यांनी गायले असून गीतकार रकीब आलम यांनी लिहिले आहे. संगीतकार अर्जुन जान्या यांनी त्याला संगीत दिले आहे. चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून हे गाणे कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.
दरम्यान, गाण्याचा वाद वाढत असला तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट या चर्चेमुळेच गाण्याला अधिक प्रसिद्धी मिळत असल्याचेही काहींचे मत आहे.