पुढारी ऑनलाईन डेस्क - झी मराठीवर 'तुला जपणार आहे' या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि चर्चा रंगली ती या मालिकेत कोणते कलाकार असणार ह्याची तर ह्या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसेच या मालिकेत नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे ह्या तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.
'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची! अंबिकाची; जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलय. आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे परंतु आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर दिसतात ते घरातले बदललेले फासे व तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक, तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट या सगळ्याचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीने तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं, जिची देवीवर नाराजी आहे, जिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते तसंच अंबिका तिच्यासोबत देवळाच्या पायऱ्याही चढू शकते.
या दोघींच्या या नात्यामागचं गूढ असेल तरी काय? अंबिकाच्या मदतीला धावून आलेली मीरा कशी तिच्या मुलीच्या आयुष्यात येणार हे पाहण्यासारखे असेल. तसेच या मालिकेचं आकर्षण आहे ते म्हणजे VFX. या मालिकेतील VFX बघण्या आणि अनुभवण्यासारखे असणार आहेत. अविस्मरणीय कथानकासोबतच डोळे दिपवणारी अशी ही भव्य मालिका असणार आहे. या मालिकेचं पटकथा लेखन करत आहे चेतन सैंदाणे आणि याचे संवाद लिहिले आहेत पूर्णानंद वांढेकर यांनी, तर मालिकेचे निर्माते आहेत आयरिस प्रोडक्शन्सचे विद्याधर पाठारे.
मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट! 'तुला जपणार आहे’ १७ फेब्रुवारीपासून रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर पाहा.