Netflix Pakistani Series Controversy: पाकिस्तानी कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी वेब सीरिजवरून भारतात नवा वाद निर्माण झाला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'जो बचे हैं संग समेट लो' (Jo Bachay Hain Sang Samait Lo) या पाकिस्तानी सीरिजला भारतात प्रदर्शित करण्यास चित्रपटसृष्टीतील संघटनांनी विरोध केला आहे.
या सीरिजमध्ये फवाद खान, माहिरा खान आणि हानिया आमिर यांसारखे लोकप्रिय कलाकार आहेत. आता या प्रकरणात ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) नेटफ्लिक्सला थेट इशारा दिला आहे. ४ डिसेंबर २०२६ पूर्वी ही सीरिज प्लॅटफॉर्मवरून हटवली नाही, तर नेटफ्लिक्सच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने नेटफ्लिक्सला या पाकिस्तानी सीरिजचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. ४ डिसेंबर २०२६ पूर्वी सीरिज हटवली नाही, तर देशभरात नेटफ्लिक्सविरोधात आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेने सांगितले आहे.
संघटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत नेटफ्लिक्सला इशारा दिला. सीरिज प्रदर्शित झाल्यास नेटफ्लिक्सच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल. तसेच भारतीय नागरिकांनी नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन रद्द करून प्लॅटफॉर्मवर बहिष्कार टाकावा, असे आवाहनही AICWA ने केले आहे.
या सीरिजमधील अभिनेता हमजा अली अब्बासी याच्याबाबतही संघटनेने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. हमजा अली अब्बासी याने यापूर्वी मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचे कौतुक केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हाफिज सईद हा लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक असून संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीत त्याचा समावेश आहे.
AICWA च्या म्हणण्यानुसार, अशा व्यक्तीचे समर्थन केल्याचा आरोप असलेल्या कलाकाराला नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या व्यासपीठावर काम देणे योग्य नाही. या माध्यमातून अशा विचारांना प्रोत्साहन मिळू शकते, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
इतकेच नव्हे, तर नेटफ्लिक्सकडून मिळणारा पैसा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता असल्याचा दावाही संघटनेने केला आहे. 'आम्हाला पडद्यावर दहशतवाद नको आणि दहशतवादाला आर्थिक मदतही नको. देश सर्वांत आधी,' अशी भूमिका AICWA ने आपल्या पोस्टमधून मांडली आहे.
दरम्यान, या सीरिजला केवळ AICWA नेच विरोध केलेला नाही. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या चित्रपटसृष्टीतील संघटनेनेही नेटफ्लिक्सला इशारा दिला आहे.
ही पाकिस्तानी सीरिज भारतात प्रदर्शित केल्यास चित्रपटसृष्टीतील कर्मचारी आणि कलाकार नेटफ्लिक्ससोबत काम करण्यास नकार देऊ शकतात, असे संघटनेने म्हटले आहे.
FWICE चे प्रतिनिधी अशोक पंडित यांनीही या सीरिजच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. पाकिस्तानच्या कारवाया आणि सीरिजमधील काही कलाकारांनी यापूर्वी केलेली वक्तव्ये लक्षात घेता, ही सीरिज भारतात प्रदर्शित करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यामुळे 'जो बचे हैं संग समेट लो' या पाकिस्तानी सीरिजच्या प्रदर्शनावरून नेटफ्लिक्सच्या अडचणी वाढल्या आहेत. आता नेटफ्लिक्स या विरोधाला कसा प्रतिसाद देते आणि ४ डिसेंबरच्या प्रदर्शनाबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.