मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने शुक्रवारी (दि. 3) आपला पासपोर्ट परत मिळाल्यानंतर एक भावनात्मक संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने रियाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये रियाने म्हटलंय की, ‘गेली ५ वर्षे संयम हाच माझा एकमेव 'पासपोर्ट' होता. असंख्य संघर्ष. अंतहीन आशा. आज, मी पुन्हा माझा पासपोर्ट हातात घेतला आहे. मी Chapter 2 साठी सज्ज! सत्यमेव जयते.’
एल्विश यादव, फातिमा सना शेख, करिश्मा तन्ना आणि अनुषा दांडेकर यांच्यासह इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांनी या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला.
पासपोर्ट कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवण्याची मागणी करणाऱ्या रिया चक्रवर्तीच्या याचिकेनंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. यापूर्वीच्या निर्बंधामुळे काम स्वीकारण्यास उशीर होत होता. तसेच यादरम्यान, अनेक संधी गमवाव्या लागल्या,’ असा युक्तिवाद रियाने केला होता.
न्यायालयाने नमूद केले की, तिने जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केलेले नाही आणि खटल्याच्या कार्यवाहीत पूर्ण सहकार्य केले आहे. या निर्णयामुळे तिला आता कामासाठी परदेशात प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. रियाला प्रत्येक प्रवासासाठी आता न्यायालयाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.
यापूर्वी, रिया चक्रवर्तीला तिचा पासपोर्ट नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)कडे जमा करावा लागत होता आणि परदेशातील प्रत्येक प्रवासासाठी ट्रायल कोर्टाची परवानगी घ्यावी लागत होती.
उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे आता रिया तिचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवू शकते, तथापि, तिला प्रत्येक प्रवासापूर्वी आणि नंतर अधिकाऱ्यांना अद्ययावत माहिती देणे, प्रवासाचा तपशील दौ-यापूर्वी सामायिक करणे आणि आपला संपर्क तपशील उपलब्ध ठेवणे बंधनकारक आहे. हा खटला अद्याप प्रलंबित असून, तिच्यावर कोणताही आरोप निश्चित करण्यात आलेला नाही.
रियाचे वकील अयाज खान यांनी यापूर्वी प्रवास निर्बंधांमुळे तिच्या करिअरवर होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकला होता. चक्रवर्तीच्या अर्जात, तिला भारताबाहेरील कामाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले होते, जे पूर्वीच्या न्यायालयीन आदेशामुळे कठीण झाले होते.
एनसीबीने, अधिवक्ता एस. के. हलवासिया यांच्यामार्फत, रियाला तिच्या सेलिब्रिटी स्टेटसमुळे विशेष वागणूक मिळू नये आणि ती पळून जाण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद करत या याचिकेला विरोध केला होता. मात्र, न्यायमूर्ती नीला गोखले यांनी खटल्यादरम्यान चक्रवर्तीच्या वर्तनाचा सखोल विचार केला.
न्यायमूर्ती नीला गोखले यांनी नमूद केले की, इतर आरोपींनाही अशीच सवलत देण्यात आली आहे आणि रिया चक्रवर्तीने खटल्याला सहकार्य केले आहे. तिला परवानगी असलेल्या प्रत्येक परदेशी प्रवासानंतर ती परतली आणि तिने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले नाही. खटला संपेपर्यंत ती उपलब्ध असेल याबद्दल 'शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही', असे न्यायालयाने स्पष्ट केले.
शिथिल केलेल्या अटींनुसार, रिया चक्रवर्तीला न्यायालयाने सूट दिल्याशिवाय खटल्याच्या सर्व तारखांना उपस्थित राहणे सुरू ठेवावे लागेल. तसेच, तिला तिच्या प्रवासाचा संपूर्ण तपशील, हॉटेल आणि विमानाचे तपशील यांची माहिती चार दिवस अगोदर एनसीबीला देणे बंधनकारक असणार आहे. तसेच फोन सुरू ठेवणे आणि भारतात परत आल्यावर अधिकाऱ्यांना सूचित करणे हेही आवश्यक असणार आहे.
एकूण ३३ आरोपींचा समावेश असलेला हा खटला अद्याप सुरू आहे.