Malhar Patekar, Tanushree Dutta File Photo
मनोरंजन

Nana Patekar son reaction: तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांच्या मुलाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "अशा लोकांना मी..."

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कौटुंबिक आयुष्याविषयी उठणारे वाद आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या विधानांवर त्यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी मौन सोडले आहे.

मोहन कारंडे

Nana Patekar son reaction

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कौटुंबिक आयुष्याविषयी उठणारे वाद आणि अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या विधानांवर त्यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी मौन सोडले आहे. मल्हार यांनी तनुश्रीचे थेट नाव न घेता, हे प्रकरण कायदेशीररीत्या कधीच संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले.

मल्हार पाटेकर यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, "ज्या जुन्या विषयाला उगीचच उकरून काढले जात आहे, तो वाद न्यायालयात कधीच मिटला आहे. न्यायालयात सर्व स्पष्ट झाले आहे, प्रकरण निकाली निघाले आहे; तरीही काही लोक सातत्याने यावर बोलत आहेत. अशा लोकांना मी काहीही बोलणार नाही. जे सत्य आहे तेच राहील; ईश्वर त्यांचे भले करो, एवढेच मला सांगायचे आहे."

नेमका वाद काय आहे?

२०१८ मधील '#MeToo' चळवळीदरम्यान तनुश्री दत्ताने २००८ च्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरांनी तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात नाना पाटेकरांचे निधन झाल्यानंतर तनुश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच, पाटेकरांनी केलेल्या वर्तणुकीचा मला कधीही विसर पडणार नाही, असे माध्यमांशी बोलताना तिने पुन्हा एकदा सांगितले होते.

"बाहेर जसे दिसते तसे नेहमीच नसते"

मल्हारने त्याचे आई-वडील, नाना पाटेकर आणि नीलकंती पाटेकर यांच्याबद्दल पसरलेल्या अफवांवरही भाष्य केले. मल्हार म्हणाले, "आम्ही सोशल मीडियावर कुटुंबाचे फोटो शेअर करत नाही याचा अर्थ आमचे नाते चांगले नव्हते असा होत नाही. वेगळे झाल्यानंतरही माझ्या आई-वडिलांचे ३८-३९ वर्षांचे नाते आणि आपुलकी कायम होती. बाहेर जसे दिसते तसे नेहमीच नसते."

"वडील शेवटच्या दिवसांत एकटे नव्हते"

नाना पाटेकर शेवटच्या दिवसांत एकटे आणि आजारी होते या चर्चांही खोट्या असल्याचे सांगितले. "जे काही वाचायला मिळत आहे, त्यावर मला इतकेच सांगायचे आहे की, ते शेवटच्या दिवसांत अजिबात एकटे नव्हते. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत होतो; आमच्यापैकी कोणी ना कोणी नेहमी त्यांच्यासोबत असायचे. ते अत्यंत सक्रिय होते आणि जिममध्ये अडीच तास व्यायाम करायचे, इतका व्यायाम तर आजकालची तरुण मुलेही करू शकत नाहीत, इतकी त्यांची शारीरिक तंदुरुस्ती होती."

सामाजिक कार्यामुळेच त्यांना खरा आनंद मिळाला

मल्हारने आपल्या वडिलांच्या समाजकार्याबद्दलही सांगितले. "चित्रपटांमध्ये तेच तेच काम करण्याचा कंटाळा आल्याने त्यांनी सिलेक्टिव्ह काम करणे सुरू केले होते. 'खामोशी' चित्रपटात त्यांनी संवाद नसतानाही उत्कृष्ट अभिनय करून दाखवला होता." पुढे बोलताना मल्हार म्हणाले, "शेवटच्या काळात काश्मीरमध्ये शाळा उभारणे आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काम करणे या सामाजिक कार्यामुळेच त्यांना खरा आत्मिक आनंद आणि समाधान मिळत होते. आता त्यांचे हेच कार्य पुढे नेणे हे माझे मुख्य ध्येय आहे."

पाच दशकांचा देदिप्यमान अभिनयप्रवास

नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय इतमामात आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १९७८ मध्ये 'गमन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नानांनी 'परिंदा', 'प्रहार', 'तिरंगा', 'क्रांतिवीर', 'अग्निसाक्षी', 'खामोशी', 'अब तक छप्पन', 'अपहरण', 'वेलकम' आणि 'राजनीती' यांसारख्या अनेक अजरामर चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT