Nana Patekar passes away File Photo
मनोरंजन

Nana Patekar passes away: “माझे जवळचे मित्र…” नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय नेतेही भावूक

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

मोहन कारंडे

Nana Patekar passes away

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या आणि त्यांच्यात "अत्यंत जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध" होते, असे गडकरी यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नानांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. माझे निकटचे मित्र नानांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरी काय म्हणाले?

"भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नाना आणि माझे अत्यंत जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर नाना पाटेकर यांनी पाच दशकांहून अधिक काळ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. संवादफेकीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे त्यांनी अनेक चित्रपट-पात्रे अजरामर केली आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे," असे गडकरी यांनी 'एक्स' वरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे.

नाना माझे निकटचे मित्र... अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी : फडणवीस

"ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे," अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

"मुख्यमंत्री झाल्यानंतर नानांच्यातील हळवा माणूस पाहिला"

"परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरे आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."

सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेला नटसम्राट : रविंद्र चव्हाण

"ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची घटना अत्यंत दु:खद व मन हेलावून टाकणारी आहे. नानांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र छाप उमटवली. आवाजातील ताकद आणि चेहऱ्यावरील भाव ही नानांच्या अभियानाची खासियत होती. 'अंकुश' आणि 'पुरुष' हे त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील दोन महत्त्वाचे माईलस्टोन ठरले. रंगभूमीपासून सुरू झालेला प्रवास पुढे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत एका मोठ्या पर्वात बदलला."

"‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्निसाक्षी’, ‘खामोशी’, ‘अपहरण’, ‘राजनीती’ यांसारख्या चित्रपटांमधून नानांनी विविध भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या. 'नटसम्राट’ सारख्या चित्रपटातून त्यांच्या अभिनयातील खोली पुन्हा एकदा जाणवली. त्यांच्या याच विविधांगी अभिनयासाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि २०१३ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. चित्रपटांसोबतच समाजातील सामान्य माणसाच्या प्रश्नांशी त्यांची नाळ जोडलेली होती. शेतकरी आणि गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून महत्त्वाचं काम केलं. आपल्याला मिळालेलं यश आणि प्रसिद्धी ही समाजाच्या उपयोगी पडावी, या भावनेतून नानांनी केलेलं कार्य सदैव प्रेरणा देत राहील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT