आलिया भट्ट (Instagram)
मनोरंजन

Alia Bhatt Secretary Arrest: आलिया भट्टला 76 लाखांचा चुना लावणाऱ्या वेदिका शेट्टीला अटक, काय आहे प्रकरण?

Alia Bhatt Duped by ex Secretary: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे

दीपक दि. भांदिगरे

Alia Bhatt cheated by secretary Vedika Prakash Shetty

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. अलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि खात्यातून ७६ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आलियाची माजी सेक्रेटरी वेदिका शेट्टी (Vedhika Shetty) हिला बंगळूरमधील तिच्या बहिणीच्या घरातून मंगळवारी अटक केली. त्यानंतर तिला मुंबईत आणण्यात आले. वेदिका हिच्याविरुद्ध जुहू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.

सेक्रेटरी म्हणून नियुक्त झाल्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत खोट्या बिलांच्या आधारावर ७६ लाख रुपये मिळवल्याचा वेदिकावर आरोप आहे. तिने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर आलिया आणि तिची आई सोनी भट्ट यांनी तिला नोकरीवरून काढून टाकले होते.

एका कार्यक्रमाच्या पेमेंटसाठी वेदिकाकडून आलियाला बिल मिळाल्यानंतर २३ जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, काहीतरी संशयास्पद आढळून आल्यानंतर आलियाने बिलावर नमूद केलेल्या नंबरवर कॉल केला आणि तो नंबर वेदिकाच्या मित्राचा असल्याचे उघड झाले.

या आधारावर आलियाने तिच्या खात्यांचे ऑडिट केले. यात वेदिका शेट्टीने ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले. या प्रकरणी जानेवारीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वेदिका मंगळूरहून राजस्थान आणि तेथून पुण्याला गेली. अखेर बंगळूरमध्ये तिचा ठावठिकाणा लागला, असे जुहू पोलिसांनी सांगितले.

मे महिन्यात सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता. तर जूनमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तिला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. त्यानंतर वेदिका शेट्टी फरार झाली होती.

'खोटी बिले तयार करुन आलियाची सही घ्यायची'

वेदिका खोटी बिले तयार करुन त्यावर आलियाची सही घ्यायची. त्यानंतर त्या बिलाचे सर्व पैसे ती त्याच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर करत होती. असे करत वेदिकाने दोन वर्षांत अलियाच्या बँक खात्यातून ७६ लाख रुपये लंपास केले.

आलियाच्या प्रॉडक्शन हाऊसबद्दल सांगायचे झाले तर त्याचे नाव इटरनल सनशाइन प्रॉडक्शन्स असे आहे. या बॅनरखाली तयार केलेला पहिला चित्रपट 'डार्लिंग्ज' होता. ज्यात विजय वर्मा आणि शेफाली शाह यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची सह-निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली होता. तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT