‘माया’चा ट्रेलर प्रेक्षकांना नात्यांमधील भावनिक गुंतागुंत आणि अंतर्मुख प्रवास अनुभवायला भाग पाडतो. गैरसमज, मनात साचलेली अढी आणि त्या अढीमुळे निर्माण होणारे अंतर या भावनिक पैलूंवर ट्रेलर प्रकाश टाकतो. तसेच, आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली भावना मोकळेपणा आणि समजूतदार संवाद यांची जाणीव करून देतो.
Mukta Barve Girish Oak Maya Trailer released
अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या अभिनयाने सजलेला माया चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. डॉक्टर-पेशंट यांच्यातील नातं, सिद्धार्थ चांदेकर सोबतचं प्रेम...नाते आणि नंतर नात्यात आलेला दुरावा...सगळ्या भावना खोलवर रुजणाऱ्या आणि विचार करायला भाग पाडणारे आहे. ट्रेलरची सुरुवात मुक्ता बर्वेच्या संवादाने होते. (entertainment news)
आदित्य इंगळे यांच्या चित्रपटात नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. आयुष्यात अनेकदा व्यक्त न केल्या गेलेल्या भावना, ओढवणारी परिस्थिती, जेव्हा भावना व्यक्त होतात, तेव्हा भावविश्वाला स्पर्श करणारी ‘माया’ उभी राहते.
पण खरोखर एकटेपणाला घाबरतो का, की आपल्या माणसांकडून दूर होण्याच्या पोरकेपणाच्या वेदनेला? नात्यांमधील सूक्ष्म गैरसमज, मनात नकळत साचत जाणाऱ्या भावना आणि त्यातून वाढत जाणारी दरी यांचे चित्रण अत्यंत संवेदनशील पद्धतीने ट्रेलरमध्ये करण्यात आले आहे. शब्दांपेक्षा न बोललेली शांतता आणि मनात दडवून ठेवलेल्या भावना कशा नात्यांना आतून कुरतडतात, हे ट्रेलर प्रभावीपणे दाखवतो.
चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने हाऊस फादरची भूमिका साकारली आहे. मुक्ता बर्वेची व्यक्तिरेखा आयुष्याच्या वळणावर उभी राहून स्वतःचे प्रश्न शोधताना दिसते, तर विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांचे अभिनय देखील उत्तम आहेत. गिरीश ओक यांची भूमिका लक्षवेधी दिसते. ते एक रुग्ण म्हणून उपचार घेत असतात. त्यावेळी मुक्ता जी त्यांच्यावर उपचार करत असते, ती म्हणते की...'एक पेशंट आहे, जो खूप उद्धट, दारूडा आणि तिरसट माणूस आहे.'
पण पुढे जाऊन ओक यांना बरे करण्यासाठी मुक्ताने केलेले प्रयत्न दोन माणसांमधील नाते संबंध दर्शवतात. चित्रपटाचे दिगदर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे.
‘माया’ मधून प्रत्येकाच्या मनात दडलेल्या, व्यक्त न केल्या गेलेल्या भावनांना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात काही नाती आपण जपतो, तर काही नकळत तुटत जातात. पण प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी संचित देऊन जातं. या कथेतून आम्हाला हे मांडायचं आहे की, भूतकाळाच्या सावल्या कितीही गडद असल्या तरी एकमेकांमधील संवाद आणि कुणाचातरी मायेने झालेला स्पर्श यांच्या जोरावर आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात करता येणं शक्य असते. प्रेक्षकांना या प्रवासात स्वतःचं प्रतिबिंब दिसेल,अशी आम्हाला खात्री आहे.-आदित्य इंगळे, दिग्दर्शक
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.