बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचे नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेता धनुषसोबत जोडले जात आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. आता नवी अफवा पसरली आहे. मृणाल आणि भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर मागील काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याची. ही चर्चा मुख्यत्वे एका रेडिट पोस्टमुळे वाढली.
त्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला होता की, दोघेही काही महिन्यांपासून एकमेकांना भेटत आहेत आणि आपले नाते लो-प्रोफाईल ठेवत आहेत. मात्र, या कोणत्याही दाव्याची अधिकृत पुष्टी कोणाकडूनही झाली नव्हती. रविवारी रात्री मृणालने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये ती चांगलीच हसताना दिसत होती आणि तिची आई तिच्या डोक्यावर चंपी करत होती. कॅप्शनमध्ये तिने स्पष्टपणे कोणाचेही नाव न घेता अफवांवर विनोदी टोला लगावला- ‘ते बोलतात.
आम्ही हसतो अफवा म्हणजे फ्री पीआरच आहे आणि मला फ्री गोष्टी आवडतात.’ तिच्या या प्रतिक्रियेतून ती आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना अजिबात गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले. या पोस्टनंतर अनेकांना असे वाटत आहे की श्रेयस अय्यरसह तिच्या नात्याबद्दल फिरणार्या अफवांमध्ये विशेष काही तथ्य नाही. मृणाल ठाकूरला प्रेक्षकांनी अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ मध्ये पाहिले होते. यापुढील काळात ती ‘है जवानी तो इश्क होना है’,‘डकैत’, ‘दो दीवाने सहर में’मध्ये दिसणार आहे.