पुढारी ऑनलाईन डेस्क : दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर मृणाल कुलकर्णी यांनी मराठीसोबतचं हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले. अनेक नाटके आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या मृणाल कुलकर्णी यांचा आज (दि. २१) वाढदिवस आहे. मृणाल यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!. त्यांचा अभिनय प्रवास आणि जीवन प्रवासबाबत जाणून घेऊया.
२१ जून, १९७१ रोजी पुण्यात जन्मलेल्या मृणाल यांचे माहेरचे आडनाव देव हे आहे. त्या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकरांच्या नात. साहित्यिक वीणा देव या त्यांच्या आई आहेत.
वयाच्या १९ व्या वर्षी लग्न
१० जून, १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होते.
बारावीत शिकत असताना मिळाली मालिका
मृणाल बारावीत असताना 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते. याविषयी बोलताना त्या एकामुलाखतीत म्हणाल्या होत्या की, स्वामी मालिकेवेळी अभिनय क्षेत्रातचं करिअर करावं, असं ठरवलं नव्हतं. केवळ संधी मिळाली म्हणून काम केलं होतं.
अभिनयाची सुरुवात
खूप कमी वयात मराठी दूरदर्शनवरील स्वामी या मालिकेपासून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. तेव्हा त्या बारावीत शिकत होत्या. स्वामीमध्ये त्यांनी माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाईंची भूमिका साकारली. या मालिकेमुळे मृणाल कुलकर्णी यांचे नाव घरोघरी पोचले.
'स्वामी' या लोकप्रिय मालिकेत 'रमाबाई ' यांची भूमिका अजरामर केल्यानंतर मृणाल कुलकर्णी यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या 'रमा माधव' या चित्रपटात 'गोपिकाबाई ' यांची भूमिका साकारली. राजा शिवछत्रपती या मालिकेत त्यांनी जिजाऊंची भूमिका साकारली होती. पुढे फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांनी जिजाऊंची भूमिका साकारली होती.
त्यानंतर त्यांनी श्रीकांत आणि द ग्रेट मराठा या मालिकाही केल्या. पुढे द्रौपदी, हसरते, मीराबाई, टीचर, खेल, स्पर्श, सोनपरी इत्यादी मालिकांमधून त्यांचा सकस अभिनय बहरत गेला. अल्फा मराठी वाहिनीवरील अवंतिका या मालिकेतील त्यांच्या अभिनयाला फार वाहव्वा मिळाली.
दिग्दर्शनाची सुरुवात
मृणाल देव-कुलकर्णी यांनी 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' (२०१४) या चित्रपटापासून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर त्यांनी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित रमा माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४) आणि रमा माधव या दोन्ही चित्रपटात त्यांनी दिग्दर्शनासोबातच अभिनयदेखील केला आहे.
चित्रपट –
कुछ मीठा हो जाये (२००५), क्वेस्ट (२००६), छोडो कल की बातें (२०१२), देह, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं (२०१४), डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बायो, यलो (२०१४), रमा माधव (२०१४), रास्ता रोको, रेनी डे, वीर सावरकर.
मालिका-
खेल, टीचर, द ग्रेट मराठा, द्रौपदी, मीराबाई, राजा शिव छत्रपती, श्रीकांत, सोनपरी, स्पर्श, स्वामी, हसरतें, राजा शिवछत्रपती.
गाजल्या ऐतिहासिक भूमिका –
रमा माधव, फत्तेशिकस्त, फर्जंद या सारख्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अभिनय साकारून मृणाल कुलकर्णींना आपला अभिनयाचा वारसा कायम जपला आहे.
प्रेग्नेंट असताना शूटिंग
एका मुलाखतीत जुन्या आठवणींना उजाळा देताना मृणाल म्हणाल्या होत्या की, माझ्या करिअरची सुरुवात लग्नानंतर झाली. बारावीत असताना मी 'स्वामी' मालिकेत काम केलं. पण, त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावं असं डोक्यातही नव्हतं. केवळ संधी मिळाली म्हणून काम केलं होतं. पण लग्न झाल्यानंतर खर्या अर्थानं या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले. मुलगा विराजस पोटात असताना मी 'श्रीकांत' मालिका करत होते. या मालिकेत माझी बंगाली स्त्रीची भूमिका होती. त्यांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे सात महिन्यांची गरोदर असेपर्यंत मी काम करू शकले. तो मोठा होईपर्यंत मृणाल त्याला शूटिंगसाठी घेऊन जात होत्या. मृणाल यांचा मुलगा विराजस सध्या माझा होशील ना या मालिकेत काम करत आहे.