“मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे Pudhari
मनोरंजन

Sonalee Kulkarni | १५२ किल्ले परत आणणाऱ्या महाराणी ताराराणींची पराक्रमी कारकीर्द लोकांसमोर येणे गरजेचे : सोनाली कुलकर्णी

“मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

पुढारी वृत्तसेवा

Mogalmardini Chhatrapati Tararani Movie Release

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना सोनाली कुलकर्णी यांनी आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. लवकरच त्यांचा “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर या चित्रपटासह ऐतिहासिक भूमिका, महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याची जागतिक पातळीवरील ओळख, मराठी संस्कृती तसेच कलाकारांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य अशा विविध विषयांवर त्यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले. ही विशेष मुलाखत पुढारीचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी घेतली.

प्रश्न: तुम्ही आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत, तुमच्या आगामी "मोगमर्दिनी छत्रपती ताराराणी” चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. कधी पर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल?

उत्तर: महाराणी ताराराणी यांचे हे 351 जयंती वर्ष आहे. या वर्षाच्या अखेरीसपर्यंत आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल असे वाटते आणि तशीच आमची इच्छा आहे. चित्रपटाचे कामही पूर्ण झाले आहे. केवळ दोन निर्मात्यांमधला वाद असल्यामुळे काही गोष्टी रखडल्या आहेत. मात्र अपेक्षा आहे की लवकरच चित्रपट प्रदर्शनाची वाट मोकळी होईल.

प्रश्न: महाराणी ताराराणींचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला वैयक्तिक पातळीवर कसं भावलं? या चित्रपटासाठी तुम्ही घोडेस्वारी, तलवारबाजी अशा गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं आहे. हा अनुभव कसा होता?

उत्तर: राहुल जाधव दिग्दर्शीत या चित्रपटाचा अनुभव फार विलक्षण आहे. महाराणी ताराराणी यांनी आपल्या आयुष्यात केलेल्या अनेक पराक्रमावर हा चित्रपट आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी यांच्या जीवन चरित्रावरून हा चित्रपट लिहिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यात बहुतांश गोष्टी झाल्या आहेत. इतिहासातल्या कुठल्याही व्यक्तीवर चित्रपट करताना त्याचे अनेक पैलू असतात. ऐतिहासिक चित्रपट करताना बरेच विचार असतात. या चित्रपटामागे असलेले संशोधन, अभ्यास किंवा घोडेस्वारी, दांडपट्टा, लाठी काठी हे कौशल्य शिकणं, यासोबतच पटकथेवरील चर्चा, विविध गोष्टी समजून घेणं शारीरिक प्रशिक्षण या गोष्टींसाठीही वर्षभराचा वेळ लागला. माझ्यासह इतरही मुख्य पात्रांना तयारीसाठी वेळ लागला. छत्रपती महाराणी ताराराणी आणि औरंगजेब हे दोन प्रमुख पात्र या चित्रपटात आहेत. छावा चित्रपटात आपण जे बघितलं त्या पुढचा भाग म्हणजे हा चित्रपट आहे. महाराणी ताराराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना गुरुस्थानी मानले. शौर्य, मुत्सद्दीपणा आणि अनेक रणनीतींचा सर्वोत्तम वापर करणाऱ्या महाराणी ताराराणी असं म्हटलं आहे. मराठा साम्राज्याचा सांभाळ करणाऱ्या अग्रणी स्त्रियांमध्ये त्यांच्या समावेश होतो. १५२ किल्ले परत आणणाऱ्या महाराणी ताराराणी होत्या. इतकी महत्त्वाची आणि पराक्रमी कारकीर्द लोकांसमोर येणे गरजेचे आहे.

प्रश्न: ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना कोणत्या प्रकारची जबाबदारी जाणवते?

उत्तर: अनेकांना ऐतिहासिक व्यक्तिरेखा चित्रपटांमधूनच समजतात आणि त्याचा त्यांच्या मनावर खोल प्रभाव पडतो. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट करताना मोठी जबाबदारी असते. इतिहासाकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असतात, तर चित्रपटात मनोरंजनाचाही भाग असतो. तो माहितीपट नसल्याने काही प्रमाणात चित्रपटस्वातंत्र्य घ्यावे लागते पण त्यालाही मर्यादा असणे गरजेचे आहे. इतिहासाची तोडमोड होऊ नये, महान व्यक्तिमत्त्वांचा अपमान होऊ नये आणि प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची संपूर्ण चित्रपट चमूने काळजी घेतली पाहिजे. आजकाल काही चित्रपटांमध्ये वास्तवाशी विसंगत गोष्टी किंवा अनावश्यक नाट्यमयता दाखवली जाते, पण ऐतिहासिक व्यक्तिरेखा मांडताना संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो. शेवटी त्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छितो, हा हेतू महत्त्वाचा असतो. महाराणी ताराराणी यांच्यावरील चित्रपट करतानाही आम्ही हीच जाणीव ठेवली. आमच्यासाठी त्यांच्या पराक्रमाला योग्य प्रकारे लोकांसमोर आणणे हीच सर्वात मोठी गोष्ट होती. ‘हिरकणी’ चित्रपटाच्या वेळीही अनेकांना त्या कथेवर चित्रपट होऊ शकतो का, असा प्रश्न होता. पण आज ‘हिरकणी’ म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो. तेव्हा जाणवतं की आपण फक्त चित्रपट करत नाही, तर एका पिढीला इतिहासाशी जोडत आहोत. हीच जाणीव ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे “मोगमर्दिनी छत्रपती ताराराणी” हा चित्रपट साकारला आहे.

प्रश्न: महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण इतिहासाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी चित्रपटसृष्टीची भूमिका किती महत्त्वाची आहे?

उत्तर: चित्रपटसृष्टीची भूमिका नक्कीच महत्त्वाची आहे, कारण दृकश्राव्य माध्यमाचा प्रभाव सर्वात जास्त असतो. आज हे माध्यम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सहज जोडणारं आणि भुरळ पाडणारं आहे. मराठी सिनेमांमधून महाराष्ट्राचा वैविध्यपूर्ण इतिहास जगापर्यंत पोहोचवण्याची मोठी ताकद आपल्याकडे आहे. मात्र आजही मराठी चित्रपटसृष्टीला विशेषतः वितरण आणि जागतिक पोहोच यासाठी संघर्ष करावा लागतो. उदा. मला दिल्लीत ‘तिघी’ चित्रपटाचा शो लावायचा झाला तरी ते सहज शक्य होत नाही. आपले चित्रपट महोत्सवांपर्यंत पोहोचतात, पण मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यास मर्यादा येतात. तेलगू आणि तमिळ चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटही जगभर व्यावसायिक पातळीवर पोहोचले तर अधिक मोठे आणि दर्जेदार सिनेमे बनू शकतील. त्याचा फायदा केवळ चित्रपटसृष्टीलाच नाही, तर मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासालाही होईल. त्याचबरोबर मराठी समाज एकत्र येणं आणि तरुण प्रेक्षक या माध्यमाशी जोडले जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

प्रश्न: महाराष्ट्रासह परदेशातही तुम्ही विविध कामानिमित्त वास्तव्यास असता. तिथे मराठी कार्यक्रमात सहभागी होता. तर महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांनी भाषा आणि संस्कृती कशी जपली पाहिजे?

उत्तर: सर्वांनी एकत्र येऊन आपले सणवार, नाटक, गाणी, चित्रपट हे सगळं साजरं करणं आवश्यक आहे. समाजाचा भाग म्हणून आपण या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात करू शकतो. जगात अनेक ठिकाणी असलेल्या मराठी माणसाने एका छताखाली एकत्र येऊन काम केले पाहिजे. अमेरिकेत प्रचंड मोठा भुभाग असून सुद्धा सगळी लोकं एकत्र येतात. परंतु सगळीकडे तसं होत नाही, ते झालं पाहिजे. मराठी माणसांकडे खूप कौशल्य आहेत, ते तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आहेत, विविध देशांमध्ये मोठ्या पदावर मराठी माणूस आहे. पण आपण जर एकत्र येऊ शकलो तर सगळं शक्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या पिढीला आपल्या भाषेविषयी आदर, आपुलकी वाटणे खूप गरजेचे आहे. आपण जर ते करू शकलो नाही तर आपली भाषा संस्कृती आपण पुढच्या पिढ्यांना देऊ शकत नाही.

प्रश्न: "मराठी शिका, मराठी जपा” हा संदेश तुम्ही अलीकडेच एका कार्यक्रमात दिला. त्यासाठी महाराष्ट्रासह जगाच्या पाठीवर असलेल्या पालकांनी, मराठी लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?

उत्तर: नवी पिढी घडवण्यात पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. कुणाचेही पहिले गुरु हे त्यांचे आई- वडील असतात आणि नंतर आपण शिक्षणासाठी बाहेर पडतो. आई-वडील मुलांशी आणि आपसातही काय बोलतात, कोणत्या भाषेत बोलतात, हेच मुलं आधी शिकतात. त्यामुळे घरात आपली भाषा आणि संस्कृती जपणं खूप गरजेचं आहे. आजच्या जगात आई-वडील दोघेही काम करणारे असल्याने मुलांसोबत वेळ कमी मिळतो आणि जसजसे आपण आणखी जागतिकीकरणाकडे चालत आहोत तसे आपण मुळांपासून लांब चाललो आहोत. घरातच आपण आपली भाषा बोलू शकलो नाही आणि त्याचा अभिमान वाटत नसेल तर तुमच्या मुलांना तो अभिमान का आणि कधी वाटेल. त्यामुळे ही अंतर्मानसिक स्तरावर करणारी गोष्ट आहे.

प्रश्न: कलाकार म्हणून ‘भूमिका’ आणि ‘वास्तविक व्यक्तिमत्त्व’ यातील फरक प्रेक्षकांनी कसा समजून घ्यावा?

उत्तर: आता आधुनिक जगात मोठ्या प्रमाणात हा फरक नाहीसा होत चालला आहे. कारण लोकांना आता जगाची माहिती बघण्यासाठी उपलब्ध आहे. सोशल मीडिया, मुलाखती आणि विविध माध्यमांमुळे कलाकारांचे विचार आणि वैयक्तिक आयुष्य लोकांसमोर येत असतं आणि लोकांना ते बऱ्यापैकी समजायला लागलं आहे. मात्र याकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. काही कलाकारांना फक्त त्यांच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचाव्यात असं वाटतं, तर काही जण स्वतःची मतंही मांडतात. सोशल मीडियामुळे अनेकांना प्रेरणाही मिळते.

प्रश्न: चित्रपट हे मनोरंजनाचं साधन असलं तरी त्याचा समाजावर प्रभाव पडतो. या अनुषंगाने भूमिका निवडताना तुम्ही कोणते निकष लावता?

उत्तर: भूमिका निवडताना मी अनेक पातळ्यांवर विचार करते. प्रेक्षक म्हणून ती कथा मला आवडते का, कलाकार म्हणून त्यात मला काही वेगळं आणि स्वतःला एक्सप्लोर करण्यासारखं आहे का, ती लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहे तसेच त्या भूमिकेचा प्रेक्षकांवर काय परिणाम होईल, याचा विचार करते. याचा अर्थ नकारात्मक किंवा खलनायकी भूमिका करायच्या नाहीत असा नाही, पण त्याचं उदात्तीकरण होऊ नये, हे महत्त्वाचं वाटतं. चुकीच्या गोष्टींचे परिणाम काय होतात, हेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मात्र नैतिक जबाबदारीबद्दल प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

प्रश्न: “नृत्य माझ्यासाठी ध्यानसाधना आहे,” असं तुम्ही म्हणता, नृत्याचा तुमच्या अभिनयाला कसा फायदा झाला?

उत्तर: मला नृत्याचा अभिनयात खूप फायदा झाला. नृत्यामध्ये खूप भावना आणि भावांग असतात. तिथे हावभाव, मुद्रा आणि देहबोलीच्या माध्यमातून शब्दांच्या पलीकडे जाऊन व्यक्त होता येतं. अभिनय आणि नृत्य एकमेकांना खूप पूरक आहेत. विशेषतः कॅमेऱ्यासमोर अनेक नव्या कलाकारांचा फोकस फक्त डायलॉगवर असतो, पण देहबोलीही तितकीच महत्त्वाची असते. नृत्यामुळे या छोट्या छोट्या मात्र महत्वाच्या गोष्टी नैसर्गिकपणे येतात. त्यामुळे एक उत्तम नृत्यांगना उत्तम अभिनेत्रीही होऊ शकते.

प्रश्न: एक उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना म्हणून तुम्ही नाव कमावलं आहे. आता त्या पुढे आणखी काही करण्याचं प्रयोजन आहे का?

उत्तर: या पुढेही मी मनोरंजन क्षेत्राशीच जोडलेली असेन कारण ही माझी आवड आणि साधना आहे. जवळपास २० वर्षे मी या क्षेत्रात काम करत असून मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःला यात पूर्णपणे गुंतवलं आहे. मी रेडिओ प्रोडक्शन, फिल्म प्रोडक्शन आणि मीडिया स्टडीज शिकले असल्याने चित्रपट निर्मितीची आणि त्यात काय करू नये याची समज देखील माझ्याकडे आहे. त्यामुळे पुढे चांगले विषय आणि कथा मिळाल्या तर निर्माती म्हणूनही काम करायला मला नक्की आवडेल, मग त्यात अभिनेत्री म्हणून माझी भूमिका असो वा नसो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT