‘Mirzapur The Movie’च्या ट्रेलरने सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा ‘भौकाल’ निर्माण केला आहे. कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू पंडित या लोकप्रिय पात्रांची मोठ्या पडद्यावर पुनरागमन होत असून मिर्झापूरच्या गादीभोवतीचा संघर्ष आणखी तीव्र झालेला पाहायला मिळतो. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांच्या दमदार भूमिकांमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
‘मिर्झापूर: द मूव्ही’ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ट्रेलरमधून ‘मिर्झापूर’च्या परिचित विश्वाचा अधिक भव्य आणि सिनेमॅटिक विस्तार पाहायला मिळतो. आतापर्यंत ओटीटीवर गाजलेली ही फ्रँचायझी आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. यावेळी संघर्षाचा आवाका मोठा असून सत्तेची चढाओढही पूर्वीपेक्षा अधिक तीव्र होताना दिसते.
मिर्झापूरच्या सत्तेवर आपला ठसा उमटवणारे कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू पंडित पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. मात्र, यावेळी त्यांचा सामना घरच्या पडद्याऐवजी थिएटरच्या मोठ्या पडद्यावर रंगणार आहे.
‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझननंतर पुढे सरकणाऱ्या या कथेत फ्रँचायझीमधील अनेक ओळखीची पात्रे पुन्हा एकत्र येताना दिसतात. कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू पंडित यांच्यासह जुने चेहरे लक्ष वेधून घेताहेत. प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच वातावरणात घेऊन जाण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. दमदार संवाद, काळा विनोद, हिंसक संघर्ष आणि सत्तेसाठीची धडपड ही ‘मिर्झापूर’ची खासियत कायम ठेवत यावेळी कथेला अधिक मोठा कॅनव्हास देण्यात आला आहे.
या कथानकाचा मुख्य केंद्रबिंदू पुन्हा एकदा ‘सत्ता’च आहे. मिर्झापूरच्या सत्तेवर कोणाचा अधिकार राहणार, याभोवती संघर्षाची नवी मालिका सुरू होते. या लढाईत काही नवे चेहरे आणि नवे दावेदार उतरतात. त्यामुळे आधीपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला वेगळे वळण मिळते.
ट्रेलरमधून ‘मिर्झापूर’चे जग पूर्वांचलापुरते मर्यादित राहणार नसल्याचे दिसते. कथानकाचा विस्तार नव्या भौगोलिक परिसरात होतो. वाळवंटाच्या पार्श्वभूमीपासून ते मोठ्या प्रमाणावरील अॅक्शन सीक्वेन्सपर्यंत चित्रपटाचा आवाका मालिकेपेक्षा अधिक व्यापक आहे.
चित्रपटात जुन्या लोकप्रिय व्यक्तिरेखांसोबत काही नवीन पात्रांचाही समावेश करण्यात आला आहे. या नव्या व्यक्तिरेखांमुळे कथेला कोणते वळण मिळते आणि मिर्झापूरच्या सत्तेच्या समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पष्ट होईल.
दमदार कलाकारांची फळी
‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदू, अली फजल, जितेंद्र कुमार, रवि किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिलगांवकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी, सोनल एस. चौहान, अनंगशा बिस्वास, शाजी चौधरी, सतेंद्र सोनी, कुलभूषण खरबंदा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. कथालेखन पुनीत कृष्णा, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाची निर्मिती केलीय. तर कासिम जगमगिया आणि विशाल रामचंदानी हे सहनिर्माते आहेत. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ येत्या ४ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. हिंदीसोबतच तेलुगू भाषेतही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.