मिर्झापूर सीझन ३ प्रेक्षकांनी किती आवडला?  mirzapur season 3
मनोरंजन

मिर्झापूर सीझन 3: पात्रांची गर्दी, बीना भाभीची घुसमट आणि गुड्डू भैय्याची (नुसतीच) दहशत

मिर्झापूर सीझन 3: बीना भाभीच्या संघर्षाची कथा आणि गुड्डू भैय्याची दहशत

पुढारी वृत्तसेवा
रोहन नामजोशी

मिर्झापूर ही सीरिज म्हटलं की समोर येतात ते कालीन भैय्या आणि मुन्ना. गुड्डू, बबलू वगैरे प्रभुतींचा नंबर त्यांच्यानंतर. पण तिसऱ्या सीझनची सुरुवातच मुन्नाच्या अंत्यसंस्काराने आणि कालीन भैय्याच्या गायब होण्याने होते. त्यामुळे या सीझनचा पडदा वर जातो तेव्हा मिर्झापूरच्या गादीची आणि पर्यायाने सीरिजची सगळी मदार गुड्डू (अली फजल) आणि गजगामिनी गुप्ता उर्फ गोलू (श्वेता त्रिपाठी) यांच्यावर आलेली पहायला मिळते. ही जबाबदारी पेलता पेलता त्यांची होणारी दमछाक. इतर बाहुबलींची आव्हानं आणि दिग्दर्शकाने निर्माण केलेल्या पात्रांशी जुळवून घेणे यातच त्यांचा वेळ जातो.

खरंतर अमेझॉन प्राईम या ओटीटीवरील ज्या लोकप्रिय वेबसिरीज आहेत त्यात मिर्झापूरचा क्रमांक वरचा आहे.(की होता?) पहिल्या सीझननंतर मिर्झापूरचे डायलॉग्स, मीम्सचा महापूर आला होता. कोरोना काळात आलेल्या दुसऱ्या सीझननंतर तो बहर ओसरला आणि आता तिसऱ्या सीझननंतर लोकप्रियतेला ओहोटी लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कथानक पुढे सरकण्याऐवजी पात्रांची इतकी सरमिसळ झाली आहे की त्यामुळे कथेला पुढे वाढायला काही वावच लेखकांनी ठेवलेला नाही.

... तर मुन्नाच्या मृत्यूनंतर आणि कालीन भैय्याच्या बेपत्ता होण्यानंतर गुड्डू आणि गोलू थेट कालीन भैय्याच्या घरात ठिय्या मांडतात. त्याच धरातली बीना त्रिपाठी (रसिका दुग्गल) हिच्या वेगळ्या आकांक्षा असतात. आता तिथे वेगळेच डावपेच रंगतील अशी अपेक्षा असते पण प्रत्यक्षात अपेक्षाभंगाचं दु:ख वाट्याला येतं.

नुसता धमक्या आणि बैठका

मुख्य पात्रच गायब झाल्यावर मिर्झापूरच्या स्वामीत्वाचा कॅनव्हास आता मिर्झापूरपुरता राहिला नसून संपूर्ण पूर्वांचल आणि पश्चिम उत्तर प्रदेशपर्यंत पसरला आहे. मुख्यत: पूर्वांचल भागात वर्चस्व मिळवण्यासाठी सगळे बाहुबली बैठक भरवतात. इथे मुख्य स्पर्धा गुड्डू पंडित आणि शरद शुक्ला (अंजुम शर्मा) यांच्यात असते. तिथेच कथेला ओहोटी लागायला सुरुवात होते. ओढूनताणून बोललेले उर्दू, सडेतोड संवादाचा अभाव आणि काहीतरी लुटूपुटूच्या खेळातले बाहुबली यांची बैठक प्रचंड हास्यास्पद प्रकार आहे. दहा भागाच्या या सीरिजमध्ये काळ्या स्कॉर्पिओंचा घेऊन सगळे बाहुबली नुसते कोणत्या ना कोणत्या गावाचा दौरा काढतात, याला धमकी, त्याच्याशी बैठक यातच सगळा वेळ जातो.

हे सगळं होत असताना तिकडे त्यागी कुटुंबाची एक वेगळीच कथा असते. ते एकतर कोणत्याच स्पर्धेत नसतात. गोलूच्या प्रेमापोटी भरत आणि शत्रुघ्न (विजय वर्मा) या जुळ्या भावापैकी शत्रुघ्नचा बळी दुसऱ्या सीझनच्या शेवटी जातो असं दाखवलंय. मात्र प्रत्यक्षात भरतचा बळी जातो आणि शत्रुघ्न भरत म्हणून जगत असतो. आपल्या घरातला एक जुळा मुलगा गेला आहे हे त्या आईबापाला कळत नाही ना त्याच्या बायकोला. अगदी रोमँटिक प्रसंगातही बायकोला नवऱ्याचा स्पर्श कळू नये हे अगदीच अनाकलनीय आहे. पण प्रेक्षक म्हणून ते आपल्यासमोर वाढून ठेवलंय त्यामुळे त्याचा आस्वाद घेण्याशिवाय पर्याय नाही.

ali fazal

या कविता हेडफोन लावूनच ऐकलेल्या बऱ्या..

पात्रांच्या या गोपालकाल्यात काही पात्रं वेगळी आहेत. ते म्हणजे रमाकांत पंडित (राजेश तेलंग) म्हणजे गुड्डूचे वडील. दुसऱ्या सीझनमध्ये आयपीएस अधिकाऱ्याची हत्या करण्याच्या आरोपाखाली ते तुरुंगात जातात. रमाकांत पंडित अतिशय तत्त्ववादी असतात. त्यामुळे तुरुंगात त्यांना एक वेगळा मान मिळतो. तिथे क्वीअर समुदायाचा मुस्लीम कवी येतो. त्याच्या कविता ऐकून कैद्यांचे मनोरंजन होतेच पण रमाकांत पंडित यांना तत्त्वांची आणि ताठ मानेने समाजात उभी राहण्याची व्यर्थताही कळते. क्वीअर समुदायाचा हा मुस्लीम कवी व्यवस्थेवर कविता करतो. त्या कविता हेडफोन लावूनच ऐकलेल्या बऱ्या.

मात्र गोलू उर्फ गजगामिनी गुप्ता ही अत्यंत नाजूक दिसणारी, छोट्या चणीची मुलगी शेवटपर्यंत बाहुबली वाटतच नाही. कितीही डोळे मोठे करून, बोलण्यात जरब आणली तरीही ती काही केल्या बाहुबली वाटत नाही. तिचं पात्र खूप वेळ स्क्रीनवर दिसतं पण साध्य काहीच होत नाही. मात्र दोन गोळ्या खाऊनसुद्धा कोणत्याही डॉक्टरचा सल्ला न घेता ती व्यवस्थित होते ही सुद्धा एक वैद्यकीय क्षेत्राची किमयाच म्हणायला हवी.

mirzapur 3

गोलू सारखंच मुख्यमंत्री माधुरी यादव (इशा तलवार) आणि बीना त्रिपाठी यांनी या संपूर्ण सीझनमध्ये रक्ताचा सारीपाट रंगवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापैकी पहिल्या दोघींना फारशी कमाल करता आलेली नाही. तिसरीला कमाल करण्याची सगळी पात्रता असून तिला फारसा वाव मिळालेला नाही. तिचा सगळा वेळ बाळाला जोजवण्यात आणि आपण मिर्झापूरच्या प्रकरणात कोणीतरी महत्त्वाचे आहोत हे दाखवण्यातच जातो.

हिंसाचारातलं हरवलेलं मर्म

हिंसाचार हा मिर्झापूरचा समानार्थी शब्द आहे. कालीन म्हणजे कार्पेट किंवा सतरंज्या. त्यांचा व्यापारी म्हणून तो कालीन भैय्या. संपूर्ण पूर्वांचलच्या बाहुबलींना उत्तर प्रदेश पोलिसांनी असंच रेड कार्पेट दिलं आहे. क्राइम सीरिज म्हटलं की हिंसाचार हा ओघाने आलाच. आता काहीतरी होईल आता कोणीतरी मरेल हे प्रेक्षकांना वाटत असताना काहीच होत नाही आणि अचानक कोणीतरी मरतो. त्यामुळे त्या हिंसाचारातलं मर्मसुद्धा हरवलं आहे. एखादा शिरच्छेद, मारहाण, हे असं काहीतरी होत राहतं. पण त्यातली उत्कंठा कुठेतरी हरवल्यासारखी वाटते. भयमुक्त प्रदेश ही कविकल्पना मुख्यमंत्री बाई मांडत असतात. पण ती अर्थातच कविकल्पना असते. म्हणजे शरद शुक्लाला तिथल्या बाहुबलींचा बादशहा व्हायचं असतं. वास्तविक हा शरद शुक्ला हा समोर बॅग लावून ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून लोकल पकडणारा तरुण वाटतो, आणि शरद शुक्ला आणि ही मुख्यमंत्री ‘हर फिक्र हो धुएं मे उडाता चला’ म्हणत ही धीरगंभीर चर्चा करतात.

mirzapur 3

प्रत्येक एपिसोड 45 ते 50 मिनिटांचा आहे, एकूण दहा एपिसोडस आहेत. पण दहा एपिसोडनंतर विचार केला तर फारसं काही घडत नाही. एकाच चित्रपटात अनेक छोट्या चित्रपटांची पटकथा घुसवून एक मेगा चित्रपट करावा असा हा तिसरा सीझन आहे. हाती काही फार लागण्याची शक्यता नाही. पण तुम्ही मिर्झापूरचे फॅन असाल तर पाहिल्याशिवाय तुम्हाला तरी कसं चैन पडेल हाही प्रश्न आहेच.

चौथ्या सीझनमध्ये काय होणार याचीही झलक दाखवली आहे शेवटी. पण ती तिथेच पाहिलेली बरी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT