मनोरंजन

लखलख चंदेरी दुनियेतील ‘शुभ्रा’ तेजश्री प्रधान

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनयात करिअर करण्यासाठी रात्रीचा दिवस करत रेल्वेमधून प्रवास करणारी एका मध्यम कुटुंबातील तेजश्री प्रधानचे नाव आज दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घरांघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान होय. आज (२ जून)  तिचा वाढदिवस आहे. मुळची मुंबईची असलेल्या तेजश्री प्रधान सहजरित्या सुंदर अभिनय साकारते. तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपला कल अभिनयाकडे वळवला. आधी सिने इंडस्ट्रीत आणि नंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान पक्के केले. चित्रपट, अभिनय आणि खासगी आयुष्यावरून तेजश्री चर्चेत राहिली आहे. तेजश्रीचा एकूणचं अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा झाला, हे थोडक्यात जाणून घेऊया.

तेजश्री प्रधान एक सुंदर अभिनेत्री आहे. तिचा जन्म २ जून, १९८८ रोजी झाला. तेजश्रीने काही मराठी चित्रपट आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे. ती मूळची डोंबिवलीची आहे. अभिनय क्षेत्रात काम करताना ती भल्या पहाटे उठून लोकलमधून प्रवास करायची. तिने आपले करिअर घडवण्यासाठी रात्रीचा दिवस केला. 

तिने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे तिने 'लेक लाडकी या घरची' मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. 'झेंडा' हा तिचा पहिला चित्रपट २०१० मध्ये रिलीज झाला. तिने या चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रदार्पण केले. नंतर पुढे चित्र, शर्यत, उदय, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे अशा विविध चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला. 

'लेक लाडकी या घरची' ही तेजश्रीची पहिली मालिका होय. पण, 'होणार सून मी या घरची' (२०१३) या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. या मालिकेनंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. तेजश्रीने रंगभूमीवरही अभिनय साकारला आहे. तिने 'कार्टी काळजात घुसली' हे नाटक रंगभूमीवर साकारारलं. त्याचसोबत तिने हिंदी रंगभूमीवरही नाटके केली. अभिनेता शर्मन जोशीसोबत 'मैं और तू' या हिंदी नाटकात तिने काम केलं होतं. पुढे शर्मन आणि तिने बबलू बॅचलर चित्रपटात पुन्हा एकत्र अभिनय केला. 

'होणार सून मी या घरची' मालिकेत तिच्यासोबत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि सुहिता थत्ते, शशांक खेतकर यांच्याही भूमिका होत्या. तिची शशांक केतकरसोबतची केमिस्ट्री चांगली रंगली होती. 

मैत्री, लग्न आणि घटस्फोट 

'होणार सून मी या घरची' या मालिकेत श्री अर्थातचं शशांक केतकर आणि जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान यांच्या जोडीला विशेष पसंती मिळाली होती. याच मालिकेतून शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान घराघरात पोहचले. तेजश्रीचा 'काहीही हा श्री'… या डायलॉगने तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. दोघांच्या सेटवरच्या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. ८ फेब्रुवारी, २०१४ रोजी या दोघांनी लग्न केलं. पण, काही काळाने त्यांच्या घटस्‍फोट झाला. 

शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. शशांकने आपल्या अर्जात म्हटंल होतं- तेजश्री आणि तिच्या कुटुंबाकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते. वारंवार जुनियर आर्टिस्ट म्हणून हिणवून मानसिक छळ केला जातो. त्यांच्या घटस्फोटानंतर मालिका संपुष्टात आली. त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची फेसबुक फ्रेंड प्रियांका हिच्यासोबत २०१७ रोजी दुसरे लग्न केले. परंतु तेजश्रीने दुसर्‍या लग्नाबाबत काही विचार केला नाही. 

'अग्गं बाई सासुबाई'मधून पुन्हा लोकप्रिय 

अग्गं बाई सासुबाई या मालिकेतून शुभ्रा नावाचे पात्र साकारून तेजश्री पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेत आसावरी अर्थातचं निवेदिता जोशी-सराफ, अभिजित राजे म्हणजेचं गिरीश ओक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. अग्गं बाई सासुबाईनंतर तेजश्री कोणत्या नव्या मालिकेत दिसणार, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT