Actress sharmila shinde
अलीकडे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. रस्ते अपघात आणि त्यात बळी पडणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण चिंताजनक आहे. रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. अनेक कलाकार, राजकारणी व्यक्तीही याला बळी पडल्या आहेत. एका अपघाताची बातमी वाचून अभिनेत्री शर्मिला शिंदे व्यथित झाली. यावेळी तिने एक अनुभव शेयर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, “मी माझ्या बॅगमध्ये कायम एक छोटी उशी, एक बेडशीट आणि एक शाल ठेवतेच. काल रात्रभर एका फिल्मची नाईट शिफ्ट करून आज सकाळी सात वाजता मी ड्राइव्ह करत घरी निघाले. झोप येऊ लागली म्हणून बोरिवलीजवळ एक सुरक्षित ठिकाण बघून रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली.
गाडीची सीट खाली केली आणि तोंडावर पांघरून घेऊन एक झोप काढली. हे असे मी बऱ्याचडा केले आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे मी एका अपघाताची बातमी वाचली आणि यापूर्वी सुद्धा अशा बऱ्याच बातम्या वाचल्या आहेत. त्यात डोळा लागून झोपेत लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. मी वाचलेल्या एका बातमीत चालक वाचला होता; पण रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक मुलगा मृत पावला. त्यामुळे मला हे लिहावंसं वाटलं. कृपया झोप येत असेल तर लगेच गाडी बाजूला घेऊन सरल एक झोप काढा. कुणी काहीही म्हणू देत आपण झोपायचे. शर्मिलाच्या या पोस्टवर अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. तसेच तिने घेतलेला निर्णय योग्य आहे असे म्हणत अनेकांनी तिचे कौतुकही केले आहे.
एक युजर म्हणते, ‘खरंच...झोप आली तर आपण risk न घेता वेळीच थांबणं महत्त्वाचं आहे...यामुळे आपण स्वतःची आणि इतरांच्या जीवाची काळजी घेऊ शकतो...अनेक लोक या विषयांवर बोलणं टाळतात...पण तुम्ही स्वतःचा experience share करत खूप मोलाचा संदेश दिला... hat's off you Diii.…’
शर्मिला काही दिवसांपूर्वी संपलेल्या 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत शर्मिलाने दुर्गाची भूमिका साकारली होती. तसेच तिला ज्याची त्याची लवस्टोरी या नाटकासाठी नाट्यपरिषदेचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री पुरस्कारही मिळाला आहे.