पुढारी ऑनलाईन डेस्क : 'देवमाणूस', 'लागिरं झालं जी' अशा गाजलेल्या मालिका, 'चौक', 'फकाट', 'डंका हरी नामचा' अशा प्रदर्शित झालेल्या व आगामी 'नाद', 'आंबट शौकीन' या आगामी चित्रपटातील नावाजलेला अभिनेता किरण गायकवाड आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. 'एफआयआर नंबर ४६९' असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच श्री. सिद्धिविनायक मंदिर मुंबई येथे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे.
बिग ब्रेन प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अगरवाल यांनी 'एफआयआर नंबर ४६९' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अर्चना भुतडा या चित्रपटात सहनिर्मात्या आहेत. मराठी अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे, अभिनेत्री अमृता धोंगडे या कलाकारांच्या मुख्य भूमिका या चित्रपट पाहायला मिळणार आहेत. योगेश कोळी यांनी छायांकन, विजय गावंडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर योगेश इंगळे यांनी कला दिग्दर्शक आणि अजिंक्य फाळके हे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.
कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. निवडक मालिका आणि अनेक चित्रपटांतून त्याने अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळे आता दिग्दर्शन म्हणून पदार्पण करताना कशा प्रकारचा चित्रपट पाहायला मिळणार हे मनोरंजनात्मक आहे. याशिवाय 'एफआयआर नंबर ४६९' या नावावरून ही कथा पोलिस तपासाची असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.