Marathi actor role in Ramayana movie
मुंबई - नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाविषयी मोठा उत्साह प्रेक्षकांमध्ये आहे. या चित्रपटात रणबीर कपूर ते यश यासारखे सुपरस्टार्स दिसणार आहेत. आता या चित्रपटात भरत यांची भूमिका कोण साकारणार, अशी चर्चा होत असताना अभिनेत्याच्या नावाचा खुलासा झाला आहे. एक मराठी अभिनेता भरत यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रणबीर कपूर स्टारर रामायणमध्ये मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे भरत यांच्या भूमिकेत दिसेल. याबद्दल खुद्द त्याने माहिती दिलीय. आदिनाथ कोठारेने एका मुलाखतीत सांगितले की, तो नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित प्रोजेक्टचा भाग आहे आणि त्यामध्ये भरत यांची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
'रामायण'चा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये रिलीज होईल. मागील काही दिवसांत निर्मात्यांकडून चित्रपटाचा फर्स्ट लूक टीजर जारी करण्यात आला. ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर तर रावणाच्या भूमिकेत साऊथ सुपरस्टार यश दिसत होता. सोबतच निर्मात्यांनी लक्ष्मण आणि माता सीतेच्या भूमिकेत कोण असणार हे देखील सांगितलं. चित्रपटात साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत असेल तर लक्ष्मण यांच्या भूमिकेत रवि दुबे असेल.
अनवट, झपाटलेला २, माझा छकुला, दुभंग, वेड लावी जिवा, शुभमंगल सावधान, चंद्रमुखी, आणि पाणी यासारख्या चित्रपटात अभिनय केला आहे. आदिनाथ कोठारे मराठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. तो दिग्गज अभिनेता महेश कोठारे यांचा मुलगा आहे. माझा छकुला चित्रपटात पहिल्यांदा बालकलाकाराची भूमिका त्याने साकारली होती. त्याने एमबीएमधून शिक्षण घेतले आहे.
ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे...मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, यासाठी मी मुकेश छाबडा, नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मला इतकी मोठी जबाबदारी दिली...आदिनाथ कोठारे, अभिनेता