हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या दूरद़ृष्टीमुळे अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यांच्या जयंतीनिमित्त हाच तो खास किस्सा, ज्याने ‘डॉन’ आणि अमिताभ बच्चन या दोघांचेही नशीब बदलून टाकले. ही गोष्ट आहे 1978 ची. दिग्दर्शक चंद्र बरौत यांचा ‘डॉन’ चित्रपट तयार झाला होता. सलीम-जावेद यांच्या दमदार लेखणीतून साकारलेल्या या चित्रपटाचे कथानक अत्यंत वेगवान आणि गुंतागुंतीचे होते.
चित्रपट पूर्ण झाल्यावर चंद्र बरौत यांनी तो मनोज कुमार यांना दाखवला. कारण, त्यांच्या चित्रपटविषयक ज्ञानावर संपूर्ण इंडस्ट्रीचा विश्वास होता. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर मनोज कुमार यांनी चंद्र बरौत यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, चित्रपट उत्तम आहे; पण त्याचे कथानक खूप गंभीर आणि सलग धावणारं आहे. मध्यांतरापूर्वी प्रेक्षकांना थोडासा विरंगुळा किंवा दिलासा देणारा क्षण नाही. यात एक गाणं टाकून कथानकाला थोडं मऊ कर. मनोज कुमार यांचा हा सल्ला दिग्दर्शकाला पटला आणि त्यानंतर चित्रपटात ‘खैके पान बनारसवाला’ हे गाणे खास तयार करून टाकण्यात आले. हे गाणे चित्रपटात येताच त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला.
अमिताभ बच्चन यांचा बनारसी अंदाज, त्यांचे नृत्य आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील जादू यामुळे हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. या गाण्यामुळे चित्रपटातील गंभीर वातावरणाला एक हलकाफुलका स्पर्श मिळाला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. 12 मे 1978 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. फक्त 70 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्याकाळी तब्बल 7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि तो त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’च्या प्रतिमेसोबतच एक जबरदस्त शपींशीींरळपशी म्हणूनही प्रस्थापित केले. आज ‘डॉन’च्या रिमेकनंतर ‘डॉन 3’ ची चर्चा सुरू असताना या मूळ चित्रपटाच्या यशामागे मनोज कुमार यांचा हात होता, हे विसरता येणार नाही.