सायली संजीव आणि भूषण पाटील यांची जोडी झळकणार 'मनमौजी'मध्ये  instagram
मनोरंजन

ManMauji Film | सायली संजीव आणि भूषण पाटील यांची जोडी झळकणार 'मनमौजी'मध्ये

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - तारुण्य हे प्रेमाचं, आकर्षणाचं असतं. म्हणूनच प्रत्येक तरुणाला कोणती ना कोणती मुलगी आवडतेच..पण मुलगी किंवा बायका न आवडणारा एखादा तरुण असेल तर? अशाच एका तरुणाची गोष्ट उलगडणाऱ्या 'मनमौजी' या चित्रपटाचे अनोखे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अतिशय फ्रेश लुक असलेला, तगडी स्टारकास्ट असलेला "मनमौजी" हा चित्रपट ८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी "मनमौजी" चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले आहे. "मनमौजी" म्हटल्यावर आपल्याला हवं तसं वागणं असं म्हणता येतं. पण चित्रपटाचा फर्स्ट लूक फार रंजक आहे. मोकळ्या वातावरणात धावत असलेल्या तरुणाबरोबर आजुबाजूच्या तरुणीही धावू लागतात आणि त्याच्या जवळ येतात. पण मनमौजी चित्रपटात तर मुली किंवा बायका न आवडणारा तरुण नायक आहे. त्यामुळे सतत जवळ येणाऱ्या बायकांमुळे त्याचं काय होत असेल याची रंजक गोष्ट या चित्रपटात उलगडणार आहे. सिक्स पॅक अॅब्ज आणि फ्रेश लुक असलेला भूषण पाटील या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT