पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्याळम चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री विंसी अलोशियसने तिच्या सहकलाकारावर गंभीर आरोप केले आहेत. तो सहकलाकार शूटिंगदरम्यान ड्रग्जच्या नशेत असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे, तर त्याने तिच्या कपड्यांशी छेडछाड करत ‘ड्रेस फिक्स’ करण्याचा हट्ट धरल्याचंही तिने उघड केलं आहे. हे प्रकरण इथेचं थांबलं नाही तर यापुढे ड्रग्जचं सेवन करणाऱ्या कलाकारांसोबत कधीच काम करणार नसल्याचं तिने जाहीर केलं आहे.
ती म्हणाली, 'एखादी व्यक्ती ड्रग्जचं सेवन करत असल्याचं मला समजलं तर त्याच्यासोबत मी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही.'
केरळमधील पल्लीपुरम येथील एका कार्यक्रमात तिने घडलेल्या घटनेबाबत खुलासा केला आहे. ही घटना एका चित्रपटाच्या सेटवर घडली असून, तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. “मी व्यावसायिक पद्धतीने माझं काम करत होते, पण माझा सहकलाकार सतत माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. एक प्रसंगात तर त्याने सांगितलं की, माझा ड्रेस योग्य रीतीने बसलेला नाही आणि त्याला तो 'फिक्स' करायचा आहे. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो नशेत होता आणि त्याने ड्रेस फिक्स करण्याचा हट्ट धरला,” असंही तिने सांगितलं.
''तो चुकीच्या पद्धतीने वागला होता. जेव्हा माझा ड्रेस व्यवस्थित करायचा होता तेव्हा तो मला म्हणाला की, मी तुला तयार व्हायला मदत करतो. हे सेटवर सर्वांनी ऐकल्यानंतर तिथलं वातावरण देखील अन्कम्फर्टेबल झालं होतं.' असंही तिने सांगितलं.
संबंधित अभिनेता कोण आहे हे अद्याप तिने जाहीर केलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आलं आहे.