पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने केवळ पाकिस्तानातच नाही, तर भारतात आणि जगभरातही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण, माहिराने तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात अनेकवेळा संघर्षांचा सामना केला आहे.
एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील संघर्षावर भाष्य केले आहे. या मुलाखतीत माहिरा तिच्या करिअरमधील सर्वात वादग्रस्त व्हायरल फोटोचाही खुलासा केला. अभिनेता रणबीर कपूरसोबत तिचा धूम्रपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. यानंतर तिला आपले करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती वाटू लागली होती.
माहिरा म्हणाली की, तो काळ खूपच चढ- उतारांचा होता. घटस्फोट, मुलाचे संगोपन, खूपच काळ सिंगल म्हणून जगलेले आयुष्य, धूम्रपान करतानाचा व्हायरल झालेला तो फोटो, दुसऱ्या देशात कामावर आलेली बंदी! हे सर्वकाही सहन करणेच खूपच कठीण होते. जेव्हा माझे फोटो व्हायरल झाले, तेव्हा 'द लिटिल व्हाईट ड्रेस' नावाचा लेख प्रकाशित झाला होता. त्यावेळी मी त्या लेखाचे महत्त्व ओळखण्यात अपयशी ठरले होते. कदाचित मला आता ते समजले की, तो लेख वाचल्यानंतर मी विचार करत होते की, माझे करिअर संपल्यात जमा आहे. मी दररोज रडत बसायचे. माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम झाला होता. माझ्या खासगी आयुष्यात बरेच काही घडले होते.