मुंबई : भारतातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठित ब्रँडपैकी एक असलेल्या 'टायटन'च्या निर्मितीचा थक्क करणारा प्रवास आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेयरने त्यांच्या आगामी 'मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी' या मालिकेचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. सत्य घटनांवर आधारित ही वेब सीरि ३ जून २०२६ पासून प्रेक्षकांसाठी ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
विनय कामत यांच्या 'टायटन - इंडियाज मोस्ट सक्सेसफुल कन्झ्युमर ब्रँड' या गाजलेल्या पुस्तकावर आधारित ही सहा भागांची वेब सीरिज असून, यात महत्त्वाकांक्षा, दृढनिश्चय, मार्गदर्शन आणि भारतीय उद्योजकता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. जागतिकीकरणाच्या आधीच्या काळातील भारताची पार्श्वभूमी असलेली ही कथा, एका धाडसी कल्पनेचे रूपांतर राष्ट्रीय वारशात कसे झाले, याचा प्रवास उलगडते.
या वेब सीरिजमध्ये मालिकेमध्ये ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जे.आर.डी. टाटा यांची भूमिका साकारली आहे, तर जिम सर्भ यांनी झेड. देसाई यांची महत्त्वाची भूमिका वठवली आहे. याशिवाय वैभव तत्त्ववादी, नमिता दुबे, लक्षवीर सरन आणि कावेरी सेठ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. करण व्यास यांनी या वेब सीरिजचे लेखन केले असून रॉबी ग्रेवाल यांचे दिग्दर्शन लाभले आहे. ऑलमायटी मोशन पिक्चर्सने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.
ट्रेलरमध्ये देश जेव्हा औद्योगिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, त्या काळात एक भारतीय घड्याळ ब्रँड उभारण्याचे झेड. देसाई यांचे स्वप्न आणि त्या प्रवासात त्यांना आलेली आव्हाने प्रभावीपणे दर्शवण्यात आली आहेत. जे.आर.डी. टाटा यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्यावरील विश्वासामुळे, सर्व अडथळ्यांवर मात करून ही कल्पना कशी आकाराला आली, याचे चित्रण वेब सीरिजमध्ये करण्यात आले आहे. घड्याळ निर्मितीच्या एका साध्या कल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास भारतीय नाविन्य आणि अभिमानाची एक मोठी यशोगाथा कशी बनतो, हे यात पाहायला मिळते.
या वेब सीरिजविषयी बोलताना ॲमेझॉन एमएक्स प्लेयरचे कंटेंट हेड अमोघ दुसाड यांनी सांगितले की, 'मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी' ही वेब सीरिज भारताच्या औद्योगिक इतिहासातील एका महत्त्वाच्या प्रकरणाला आणि त्यातील उद्योजकीय वृत्तीला अधोरेखित करते. देशांतर्गत नाविन्य आणि जागतिक दर्जाच्या भारतीय उपक्रमांचा हा उत्सव असल्याचे त्यांनी नमूद केले.
जे.आर.डी. टाटा यांची भूमिका साकारणारे नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले की, टाटांचा शांत आत्मविश्वास आणि इतरांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करण्याची त्यांची क्षमता मला नेहमीच आकर्षित करते. ही मालिका केवळ एक ब्रँड उभारण्याबद्दल नसून, ती माणसे, विश्वास आणि यशाची खात्री नसतानाही एका कल्पनेला पाठिंबा देण्याच्या धैर्याबद्दल आहे.
दुसरीकडे, झेड. देसाई यांची भूमिका साकारणारे जिम सर्भ यांनी आपल्या पात्राचे वर्णन करताना सांगितले की, ते शांतपणे बंडखोर आणि प्रस्थापित नियमांना आव्हान देण्यास न घाबरणारे व्यक्तिमत्व होते. या मालिकेच्या केंद्रस्थानी मानवी भावना असून ती चिकाटी, अंतर्ज्ञान आणि विश्वासावर आधारित आहे. या वेब सीरिजमधील पात्रांची मांडणी आणि त्या काळातील भारताचे चित्रण पाहता, प्रेक्षकांसाठी ही एक उत्कंठावर्धक मेजवानी ठरणार आहे.
'मेड इन इंडिया - अ टायटन स्टोरी' ही वेब सीरिज मोबाइलसह कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओ टीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीमवर प्रेक्षक विनामूल्य पाहू शकतील.