Maatrubhumi First Review Pudhari
मनोरंजन

Maatrubhumi First Review: ‘मातृभूमी’चा पहिला रिव्ह्यू समोर! सुभाष घई म्हणाले, सलमानचा हा सिनेमा....

Maatrubhumi First Review: सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला असून सुभाष घई यांनी त्याला ‘मस्ट वॉच’ म्हटलं आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maatrubhumi First Review: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार भूमिकेत दिसणार आहे. यावेळी तो ‘मातृभूमी’ या वॉर ड्रामा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पोस्टर, गाणी आणि दमदार टीझरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या सिनेमाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू (First Review) समोर आला असून, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी या सिनेमाला ‘मस्ट वॉच’ म्हटलं आहे.

सुभाष घईंचा ‘मातृभूमी’ला हिरवा कंदील

अलीकडेच सुभाष घई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करत ‘मातृभूमी’चा रफ कट पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया दिली. त्यांनी सलमान खान, कबीर खान, बड़जात्या, चित्रांगदा सिंह, सिद्धार्थ रॉय कपूर, रितेश देशमुख आणि डेव्हिड धवन यांच्यासोबतचा फोटो शेअर केला.

या पोस्टमध्ये घई यांनी लिहिलं की, “आज फूड स्क्वेअरमध्ये माझ्या आवडत्या दिग्दर्शकांसोबत वेळ घालवण्याचा सुंदर अनुभव मिळाला. आम्ही अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘मातृभूमी’चा रफ कट पाहिला. भारत-चीन सैनिकांच्या भावनिक कथेला सादर करणारा हा चित्रपट नक्की पाहावा असा आहे.” या प्रतिक्रियेनंतर सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

नेमका काय आहे ‘मातृभूमी’चा वाद?

‘मातृभूमी’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाचं आधीचं नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ होतं. हा सिनेमा 2020 मधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यामध्ये झालेल्या संघर्षावर आधारित असल्याचं सांगितलं जातं.

टीझरमध्ये सलमान खानला पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिकांचं नेतृत्व करताना दाखवण्यात आलं होतं. मात्र, टीझर रिलीज झाल्यानंतर चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या माध्यमाने चित्रपटावर टीका करत तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप केला होता. यानंतर वाद वाढू लागल्याने निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदलून ‘मातृभूमी’ ठेवलं. काही वृत्तांनुसार, वादानंतर चित्रपटातील काही भागांचं पुन्हा शूटिंगही करण्यात आलं.

सलमानसाठी मोठं आव्हान

दरम्यान, सलमान खानने याआधीच या चित्रपटाच्या शूटिंगबाबत बोलताना अनेक आव्हानांचा उल्लेख केला होता. विशेषतः लडाखमधील उंच भागात आणि प्रचंड थंड वातावरणात शूटिंग करणं अत्यंत कठीण असल्याचं त्याने सांगितलं होतं.

एका मुलाखतीत सलमान म्हणाला होता, “या सिनेमासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. धावणं, ट्रेनिंग, अॅक्शन सीन यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागतो. लडाखमध्ये शूटिंग करताना गोठवणाऱ्या पाण्यात काम करणं सोपं नाही.”

चाहत्यांची उत्सुकता शिगेला

वाद, नावात बदल आणि शूटिंगमधील अडचणी यामुळे चर्चेत राहिलेला ‘मातृभूमी’ आता रिलीजपूर्वीच पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच सुभाष घईंसारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाने दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. आता सलमान खानचा हा वॉर ड्रामा बॉक्स ऑफिसवर किती कमाल करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT