Tukaram Mundhe on Nana Patekar Pudhari
मनोरंजन

Tukaram Mundhe on Nana Patekar: “लव्ह यू, बाळा…” नाना पाटेकरांचे ते शेवटचे शब्द; नानांच्या आठवणीने तुकाराम मुंढे भावूक

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तुकाराम मुंढे यांनी त्यांच्यासोबतच्या शेवटच्या संवादाची भावूक आठवण सांगितली.

Rahul Shelke

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जवळचे मित्र आणि सहकारी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी नाना पाटेकर यांना केवळ एक उत्तम कलाकार नव्हे, तर एक असामान्य माणूस आणि जवळचा मित्र असल्याचे म्हटले आहे.

तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांच्याशी अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांचे बोलणे झाले होते. हाच आपला शेवटचा संवाद असेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. त्या संभाषणाच्या शेवटी नाना पाटेकर यांनी त्यांना, “लव्ह यू, बाळा” असे म्हटले होते. नानांचे हे शेवटचे शब्द आयुष्यभर आपल्या मनात राहतील, असे मुंढे यांनी म्हटले आहे.

“काही माणसं आपल्या आठवणी मागे ठेवून जातात. पण काही माणसं आपल्या आयुष्याचाच एक भाग बनून जातात. नाना त्यापैकीच एक होते,” अशा भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केल्या. “गुडबाय, माझ्या मित्रा. तुझी खूप आठवण येईल आणि तू कायम स्मरणात राहशील,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुण्यातील फार्महाऊसवर होणार अंत्यसंस्कार

दरम्यान, नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुणे जिल्ह्यातील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांनी याबाबत माहिती दिली.

नाना पाटेकर यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता पुण्यात आणले जाणार आहे. त्यानंतर चाहत्यांना आणि त्यांच्या परिचितांना अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी पार्थिव काही काळ ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या फार्महाऊसच्या परिसरातच अंत्यसंस्कार केले जातील.

नाना पाटेकर यांचे फार्महाऊस पुणे शहराच्या बाहेरील डोणजे परिसरात आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शासकीय इतमामाची तयारी करण्यात येणार असल्याची माहितीही गणेश थोरात यांनी दिली.

नाना पाटेकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर, मित्रपरिवारावर आणि असंख्य चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अभिनयाची वेगळी शैली, दमदार आवाज आणि साधेपणामुळे ते अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून होते. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक मोठा कलाकार आणि माणूस गमावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT