Ram kapoor statment on Shreya kalra kiss controversy in Lock Upp Season 2  Pudhari photo
मनोरंजन

Ram Kapoor-Shreya Kalra Controversy : कपाळ, गालावर वारंवार Kiss; श्रेया कालरा किस वादावर राम कपूरने अखेर सोडलं मौन

Ram kapoor-Shreya kalra controversy |कपाळ, गालावर वारंवार Kiss; श्रेया कालरा किस वादावर राम कपूरने अखेर तोडलं मौन; म्हणाला, “मी स्वतःला बदलणार नाही”

पुढारी वृत्तसेवा

अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री श्रेया कालरा यांच्यातील किसचा वाद ‘लॉक अप 2’ संपल्यानंतरही चर्चेत राहिला. शोमध्ये राम कपूरच्या वागण्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं श्रेयाने म्हटलं होतं. विशेष म्हणजे, एका टास्कनंतर रामने उत्साहाच्या भरात श्रेयाच्या गालावर आणि कपाळावर वारंवार किस केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर श्रेयाने यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता या घटनेनंतर जवळपास २५ दिवसांनी राम कपूरने एका पॉडकास्टमध्ये संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.

टास्कनंतर नेमकं काय घडलं?

‘लॉक अप 2’मध्ये टीम लीडर निवडण्यासाठी एक टास्क घेण्यात आला होता. या टास्कनंतर शिवांगी जोशीला सर्वाधिक मतं मिळाली होती, तर आकांक्षा चमोला दुसऱ्या क्रमांकावर होती. टास्कदरम्यान राम कपूर काही स्पर्धकांच्या खूप जवळ गेल्याचंही समोर आलं होतं. यावेळी हर्षद चोपडाने रामला टोकल्याचं श्रेयाने सांगितलं होतं.

यानंतर सह-स्पर्धकांशी चर्चा करताना श्रेयाने रामच्या वागण्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. राम कपूर अनेकदा तिला किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिने केला होता. त्याच्या या कृती आपल्याला आवडत नसून त्यामुळे अस्वस्थ वाटत असल्याचं श्रेयाने स्पष्ट केलं होतं. आपल्या नाराजीला अधिक ठळकपणे मांडताना श्रेयाने प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक मर्यादांचा आदर केला पाहिजे, असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर राम कपूरच्या वागण्यावरून मोठी चर्चा रंगली होती.

राम कपूरने स्पष्टीकरण काय दिलं?

ue शो संपल्यानंतर काही काळ या प्रकरणावर शांत राहिलेल्या राम कपूरला नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. श्रेया त्याच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असल्याने तिच्याशी वागताना काही ठराविक मर्यादा पाळायला हव्या होत्या का, असं त्याला विचारण्यात आलं. यावर रामने हा विषय गरजेपेक्षा अधिक मोठा करण्यात आल्याचं म्हटलं. या घटनेबाबत त्याने श्रेयाशी शोमध्येच अनेकदा चर्चा केली होती, असंही त्याने सांगितलं. आपल्या कृतीमागे तिला अस्वस्थ करण्याचा किंवा चुकीचा हेतू नसल्याचं त्याने श्रेयाला स्पष्ट केल्याचं रामने नमूद केलं.

“२७ वर्षांच्या करिअरमध्ये कधी तक्रार झाली नाही”

राम कपूरने आपल्या २७ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीचा दाखला देत आपली बाजू मांडली. आतापर्यंत ज्या-ज्या महिला कलाकारांसोबत त्याने काम केलं, त्यापैकी कोणत्याही महिलेने त्याच्या वर्तनाबाबत तक्रार केली नसल्याचं त्याने सांगितलं. लोक त्याच्या वागण्याबद्दल काय बोलतात किंवा त्याचा कसा अर्थ लावतात, याची आपल्याला चिंता नसल्याचं रामने स्पष्ट केलं. मी जसा आहे तसाच राहणार. इतरांच्या बोलण्यामुळे स्वतःमध्ये बदल करणार नसल्याचे त्याने नमूद केलं.

“नकारात्मक गोष्टींसाठी वेळ घालवणार नाही”

या वादावर पुन्हा पुन्हा चर्चा करण्यात आपल्याला रस नसल्याचंही राम कपूरने स्पष्ट केलं. आयुष्य वेगाने पुढे जात असताना नकारात्मक मुद्द्यांमध्ये अडकून राहण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्याने सांगितलं.

रामच्या म्हणण्यानुसार, शोमध्येच श्रेयासोबत या विषयावर त्याचं बोलणं झालं होतं. नंतर श्रेयानेही भेटून त्याच्या कृतीचा चुकीचा अर्थ घेतला गेला असल्याचं स्पष्ट केल्याचं रामने सांगितलं. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर आपला वेळ वाया घालवण्याची इच्छा नसल्याचं रामने ठामपणे सांगितलं. आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी आहेत आणि त्यावरच लक्ष केंद्रित करणं पसंत असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT