पुढारी ऑनलाईन डेस्क - झी मराठीवर 'लक्ष्मी निवास' या मालिकेचा टिझर प्रसारित झाला आणि चर्चा रंगली ती या मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन दिग्गज कलाकार दिसण्याची शक्यता असल्याची. आता याच मालिकेचा दुसरा टिझर प्रसारित झाला. यात हर्षदा खानविलकर, तुषार दळवी या कलाकारांवर शिक्कामोर्तब झालं असून, यांच्या सोबतच अजून एक ओळखीचा चेहरा या मालिकेत दिसतोय, तो म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या पाठक बाई अर्थात 'अक्षया देवधर'. हा अजून एक चेहेरा प्रेक्षकांसमोर आल्यामुळे मालिकेबद्दलची आणि आणखी कोण कलाकार असणार याची उत्कंठा आणि उत्सुकता आणखी वाढली आहे.
'लक्ष्मी निवास' ही कथा आहे, स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. ३ मुलं, ३ मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत.
एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे. या मालिकेचं लेखन करत आहे सायली केदार, तर मालिकेचे निर्माते आहेत सोमिल क्रिएशन सुनील भोसले.