अनुपमा गुंडे
चित्रपटाचे दशावतार नाव पाहिले आणि ऐकले की हा चित्रपट कोकणातील दशावतार या लोप पावत चाललेल्या कलेचा ठाव घेणारा असेल, असा विचार मनात येतो, पण चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केवळ कोकणातील दशावतार कलेचे सुंदर सादरीकरण यापुरताच हा विषय मर्यादित ठेवला नाही तर या चित्रपटाला सामाजिक आणि निसर्गाच्या हाकेची जोड दिली आहे.
निसर्गसंपन्न कोकण...आजही कोकणाची ही संपन्नता काही अंशी अबाधित आहे. कोकणच्या निसर्गावर घाला घालण्याची सुरवात दाभोळच्या एन्रॉन प्रकल्पापासून झाली. एन्रॉन प्रकल्प अंतर्गत घोटाळ्यामुळेच बंद पडला. पण तेव्हापासून कोकणवासीय निसर्ग की विकास या द्वंद्वातून जागे झाले. अजूनही कोकणच्या निसर्गावर जैतापूर औष्णिक प्रकल्प, खाणकाम, रासायनिक प्रकल्पांची टांगती तलवार कायम आहे.
कोकणचा हा निसर्ग अजूनही वाचवा अशी साद तुम्हाला घालतोय. त्यामुळे विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे विनाशी प्रकल्प की निसर्ग हा मती जागविणारा संदेश दिग्दर्शकाने दशावतारमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. कला आणि निसर्ग याची सुरेख गुंफण करण्यात चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत.
बाबुली (दिलीप प्रभावळकर) या ज्येष्ठ दशावतार सादर करणार्या कलाकाराची कथा आणि व्यथा आहे, अशी चित्रपटाची सुरुवात पाहून वाटते. बाबुली आपल्या कलेप्रती अतिशय प्रामाणिक, निष्ठावान होऊन जगणारा कलाकार. कलाकार म्हणून तो दशावताराची परंपरा जशी जीवापाड जपतो, तितक्याच उत्कट भावना निसर्गाप्रतीही आहेत. त्यामुळे पायाखाली मुंगीही मरू नये म्हणून सतत भूतदयेने वावरणार्या बाबुलीला आता त्याचे डोळे साथ देत नाहीत, त्यामुळे त्याचा मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) डॉक्टरकडे घेऊन जातो.
डॉक्टर (गुरू ठाकूर) दशावताराच्या प्रयोगात प्रखर प्रकाशात आता काम केले तर रातांधळेपणा येईल, असे सांगतात, पण माधवला नोकरी लागल्यावर आपण दशावतारमध्ये काम करण्याचे सोडू, असे आश्वासन बाबुली देतो. माधवला नोकरी लागते आणि तिथून चित्रपटाची कथा एका रंजक वळणावर येतेे. दशावतार आणि निसर्ग याची दिग्दर्शकाने नेमकी काय सांगड घातली आहे, हे पाहण्यासाठी चित्रपटगृहात नक्की जावं असा हा चित्रपट आहे.
दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकाराने एक दशावतारी कलाकार आणि निसर्गावर जीवापाड प्रेम करणारा माणूस जीवंत केला आहे. विजय केंकरेनी साकारलेला कॅबिनेट मंत्री (अशोक सरमळकर) ही छोट्या भूमिकेत चपखल. माधवनेही मुलगा चांगला साकारला आहे. हास्यजत्रेत विनोदी स्कीट करणारी प्रियदर्शनी इंदलकर हिने (वंदना सोमण) अवखळ प्रेयसी ते पर्यावरणासाठी लढणारी तरूणी ताकदीने साकारली आहे.
राजकारण्याचा माज असलेला मुलगा मॉन्टी (अभिनय बेर्डे) छोट्या भूमिकेतही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. डीकास्टाच्या छोटेखानी भूमिकेत महेश मांजरेकर आपला मांजरेकरी ठसा उमटवतात. इतर सर्व कलाकारांनी कथेच्या साजाला भूमिका साकारल्या आहेत. कोकणवरच नाही तर निसर्गावर प्रेम करणार्यांनी पहावा असा हा चित्रपट आहे.