मनोरंजन

Special Ops 2 trailer : हिम्मत सिंहचा सायबर दहशतवादाविरुद्ध एल्गार! ‘स्पेशल ऑप्स 2’ चा थरारक ट्रेलर रिलीज

VIDEO : के के मेनन याने स्पेशल ऑप्समधील प्रमुख पात्र हिम्मत सिंहच्या भूमिकेला अजरामर केलं आहे.

रणजित गायकवाड

बॉलीवूड अभिनेता के के मेनन याच्या ‘स्पेशल ऑप्स’ या सुपरहिट वेब सीरिजने 2020 मध्ये प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. पहिल्या सीजनच्या यशानंतर स्पेशल ऑप्स 1.5: द हिम्मत स्टोरीने हिम्मत सिंहच्या पार्श्वभूमीची कहाणी सांगितली. आता, तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्पेशल ऑप्स 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. ही सीरिज 11 जुलै रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरची झलक आणि कथानक

केके मेनन हिम्मत सिंहच्या भूमिकेत पुन्हा एकदा OTT स्क्रीनवर झळकणार आहे. त्याच्यासोबत करण टाकर, विनय पाठक, मुजम्मिल इब्राहिम, सायामी खेर, मेहर विज यांसारखे जुने कलाकारही सीरिजमध्ये आहेत. यावेळी ताहिर राज भसीन हा नवा खलनायक म्हणून सीरिजमध्ये प्रवेश करत आहे. त्याच्यासोबत प्रकाश राज, दिलीप ताहिल, परमीत सेठी, कली प्रसाद मुखर्जी, अरिफ झकारिया, गौतमी कपूर, कमाक्षी भट, शिखा तलसानिया, रेवती यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

स्पेशल ऑप्स 2च्या ट्रेलरने प्रेक्षकांना पुन्हा एकदा हिम्मत सिंहच्या थरारक विश्वात घेऊन जाण्याची तयारी केली आहे. या सीरिजमध्ये हिम्मत सिंहच्या पुढील कथानकावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ट्रेलरमध्ये सायबर दहशतवादाचा सामना करताना हिम्मत सिंहच्या नव्या मिशनची झलक दिसते. ट्रेलरची सुरुवातच इतकी दमदार आहे, की प्रेक्षकांना पहिल्या सीजनच्या रोमांचकारी आठवणी ताज्या होतात. के के मेनन याने पुन्हा एकदा हिम्मत सिंहच्या भूमिकेत शिरून दमदार अभिनय साकारला आहे. त्यांच्यासोबत प्रकश राज, करण टक्कर, विनय पाठक आणि आफताब शिवदासानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील, ज्यामुळे ही सीरिज आणखी रंजक होणार आहे.

ट्रेलरमध्ये हाय-टेक सायबर क्राइम, तणावपूर्ण दृश्ये आणि हिम्मत सिंहच्या बुद्धिमत्तेचा वापर करून गुन्हेगारांना चकवण्याच्या रणनीती दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्या सीजनने भारतीय वेब सीरिजच्या निर्मिती डिझाइनमध्ये एक नवीन मापदंड प्रस्थापित केला होता. त्यामुळे दुसऱ्या सीजनकडूनही तशीच अपेक्षा आहे. सायबर दहशतवादासारख्या समकालीन विषयाला हाताळताना ही सीरिज थ्रिल, ॲक़्शन आणि इमोशन यांचा संगम घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करेल यात शंका नाही. चाहत्यांनी या सीरिजच्या ट्रेलरला ‘पहिल्या सीजनपेक्षा 10 पटीने खतरनाक’ असल्याचं वर्णन केलं आहे, ज्यामुळे अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

‘के के’चा अभिनय आणि चाहत्यांचा प्रतिसाद

के के मेनन याने स्पेशल ऑप्सच्या पहिल्या सीजनमधून हिम्मत सिंहच्या भूमिकेला अजरामर केलं आहे. त्याच्या प्रत्येक दृश्यात दिसणारी तीव्रता आणि खोली यामुळे हे पात्र प्रेक्षकांचे लाडके ठरले आहे. ‘द रेल्वे मेन’सारख्या सीरिजमधूनही केकेने ओटीटीवर आपली छाप सोडली होती.

सीरिजची पार्श्वभूमी आणि अपेक्षा

स्पेशल ऑप्स ही सीरिज रॉ (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) एजंट हिम्मत सिंहच्या मिशनवर आधारित आहे. पहिल्या सीजनमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या मागील मास्टरमाइंडला पकडण्यासाठी हिम्मत सिंहच्या प्रयत्नांची कहाणी दाखवण्यात आली होती. स्पेशल ऑप्स 1.5 मध्ये त्याच्या तरुणपणीच्या प्रवासावर आणि रॉ मधील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांवर प्रकाश टाकला गेला. आता दुसऱ्या सीजनमध्ये हिम्मत सिंह नव्या आव्हानांना सामोरे जाणार आहे. सायबर दहशतवादासारख्या जटिल विषयाला हाताळताना ही सीरिज तितकीच तीव्र आणि बुद्धिमत्तापूर्ण असेल, असा चाहत्यांना विश्वास आहे.

निर्माते नीरज पांडे यांनी या सीरिजच्या पहिल्या सीजनला प्रचंड यश मिळवून दिलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सीजनकडूनही तशीच अपेक्षा आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेली हाय-ऑक्टेन ॲक्शन, रहस्यमय कथानक आणि के के मेनन याचा दमदार अभिनय यामुळे ही सीरिज पुन्हा एकदा ओटीटीवर धमाका करेल. पांडे यांनी सांगितलं की, ‘स्पेशल ऑप्स 2 पहिल्या सीजनपेक्षा मोठ्या प्रमाणावर आणि अधिक तीव्र असेल. शूटिंग बुडापेस्ट, तुर्की, जॉर्जिया आणि इतर ठिकाणी झाली असून, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) वर विशेष मेहनत घेण्यात आली आहे.’ या सीरिजचं पोस्ट-प्रोडक्शन पूर्ण झालं असून, ती आता प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT