पुढारी ऑनलाईन डेस्क - घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत, कुटुंबासाठी अतोनात कष्ट करत प्रत्येक स्त्री रोज बाहेर पाऊल टाकते. पण या सगळ्या प्रवासात तिच्या सुरक्षेचं, तिच्या अस्तित्वाचं आणि स्वाभिमानाचं काय होतं? अन्याय निमूटपणे सहन करणं हेच तिचं भाग्य असतं का, की या सगळ्या विरोधात बंड पुकारण्याची ताकद तिच्यात असते? जेव्हा एखादी स्त्री या अन्यायाविरुद्ध पेटून उठते, तेव्हा तिचं रूप किती रौद्र आणि भयंकरसूचक असू शकतं, हे आपल्याला आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मुंबईत एका सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर त्यातील दृश्यांची बरीच चर्चा रंगली आहे.
घनदाट जंगल, काळोख रात्रीचा गूढ भास, निर्मनुष्य रस्ता, बसचा प्रवास, पोलिसांचा कसून सुरू असलेला तपास आणि त्यात रिंकूचे अंगावर काटा आणणारे जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळताहेत.
रिंकू राजगुरू पहिल्यांदाच अॅक्शन अंदाजात प्रेक्षकांसमोर दिसणार आहे. तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय? तिच्यासमोर कोणती मोठी संकटं उभी ठाकली आहेत? आणि या सगळ्यामागचं नेमकं गूढ काय आहे? या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
या चित्रपटात रिंकू व्यतिरिक्त किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कसलेले कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ही कथा नेमकी काय आहे, सिनेमातील कलाकारांच्या भूमिका काय असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
दिग्दर्शक तृशांत इंगळे म्हणाले, स्त्रीचं आयुष्य फक्त चार भिंतीतील जबाबदाऱ्यांपर्यंत सीमित नसतं. दररोजच्या जगण्यात तिला अनेक आघाड्यांवर स्वतःसाठी लढावं लागतं. ‘जिजाई’मधून आम्ही अशाच एका खऱ्याखुऱ्या स्त्रीचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा स्वाभिमान आणि अन्यायासमोर न झुकता पेटून उठण्याचा निर्णय हा या चित्रपटाच चा आत्मा आहे. रिंकूने ही भूमिका ज्या ताकदीने उभी केली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी सांभाळले असून, निर्मिती झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्सने केली आहे. या प्रकल्पात नुपूर गुहा आणि तुषार राऊत यांनी सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे, गुलराज सिंग यांचे संगीत आहे. एका स्त्रीच्या स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची साक्ष देणारा हा ‘जिजाई’ चित्रपट येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.