पुणे : ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांची उत्तम कथा, कलाकारांचा उत्तम अभिनय आणि ना. धों. महानोर यांच्या गीतांचे रसिकांवर गारूड असलेला ‘जैत रे जैत’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आठवडाभरही चालला नाही. आम्ही चार आठवड्यांसाठी चित्रपटगृह आरक्षित करूनही तो फक्त जेमतेम सहा दिवसांनंतर काढावा लागला. आर्थिक नुकसानही झाले. पण, नंतर या चित्रपटाला सगळीकडून दाद मिळाली, अनेक पुरस्कारही मिळाले. खूप वेगळा प्रयोग होता. लोकांनी तो आनंदाने स्वीकारला, अशी आठवण ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी मंगळवारी (दि. 5) सांगितली. आज 48 वर्षांनंतरही चित्रपटाची जादू कायम आहे. आणखी 48 वर्षेसुद्धा चित्रपट गाजेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Pune Latest News)
‘जैत रे जैत’ चित्रपटाच्या 48 व्या वर्षानिमित्त महक संस्थेच्या वतीने पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानिमित्त या चित्रपटाचे संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि पटकथा लेखक सतीश आळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी पं. मंगेशकर यांच्यासह डॉ. आगाशे आणि आळेकर यांनी आठवणींना उजाळा दिला.
‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ हे गीत सर्वांत लोकप्रिय झाले असले, तरी संगीतकार म्हणून मला ‘नभ उतरू आलं’ हे गीत आवडते. ‘नभ उतरू आलं’ यामध्ये विलक्षण काव्य लपले आहे, असे सांगतानाच पं. मंगेशकर यांनी ‘पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं’ हे गीत चित्रपटातून कापावे लागले, याचा मला खेद वाटतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पं. मंगेशकर म्हणाले, 48 वर्षांनंतरही चित्रपटातील गाणी रसिक ऐकतात, ही आनंदाची गोष्ट आहे. हा गावातला चित्रपट आहे. या चित्रपटासाठी गावाकडच्या वातावरणाशी एकरूप झालो होतो. जिथे माणूस एकरूप होतो ती चांगली कलाकृती असते. मला संगीत आवडते म्हणून माझ्याकडे संगीताची जबाबदारी आली आणि मी या चित्रपटाच्या संगीतात अभिनव प्रयोग केला. ‘जैत रे जैत’सारख्या कालातीत कलाकृतींसाठी सगळेच एकत्र आले. सतीश आळेकर, स्मिता पाटील, डॉ. मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल असे अनेक दिग्गज लोक एकत्र आले आणि एक चांगला चित्रपट निर्माण झाला.
चित्रपटाबद्दल बोलताना आळेकर म्हणाले, संगीत हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. लोकप्रिय आणि कलात्मकता याचे मिश्रण असलेल्या ‘जैत रे जैत’मध्ये परंपरा आणि नवतेचा संगम साधला गेला आहे. पं. मंगेशकर यांनी आदिवासी संगीतातून प्रेरणा घेऊन नवीन पद्धतीच्या संगीताचे विश्व उभे केले. आजही 48 वर्षांनंतर हा चित्रपट लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, याचा आनंद आहे. आम्ही चित्रपटाचा भाग आहोत, याचाही आनंद वाटतो.
‘जैत रे जैत’चे गारूड आजही आहे. यातील नाग्या ही माझी व्यक्तिरेखा मनाने सरळ किंवा भाबडा म्हणू अशी आहे. गोनीदांना उलगडलेले हे पात्र डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले तसे मी पडद्यावर साकारले. याउलट मनाला पटते तसे वागणारी चिंधी ही मनस्वी आहे. अमराठी भाषकांनाही हा चित्रपट आवडला, असे डॉ. आगाशे यांनी सांगितले.