पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री, माजी मिस वर्ल्ड टुरिझम इशिका तनेजाने बॉलिवूडला अलविदा म्हटलं आहे. द्वारिका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांच्याकडून जबलपूरमध्ये गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घेतल्यानंतर इशिका म्हणाली, आतापर्यंत ती नेम आणि फेमसाठी धावत होती. परंतु, नेम आणि फेम तर खूप कमावलं. पण आत्मशांती आणि मनाची संतुष्टी मिळाली नाही.
आपल्या जीवनात प्रकाशाच्या शोधात बॉलीवूडची अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड टुरिझम इशिका तनेजा दिल्लीहून जबलपूर पोहोचली. तिथे तिने द्वारिका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांच्याकडून गुरु दीक्षा घेतली.
भगवे कपडे घालून इशिका तनेजा दीक्षा घेण्यासाठी पोहोचली. शंकराचार्य यांच्याकडून दीक्षा घेण्याचे कारण सांगताना तिने सांगितले की, ‘मी माझ्यासाठी खूप काही केलं. अनेक ॲवॉर्ड जिंकले. अनेक रेकॉर्ड बनवले. पण तो प्रवास अगदी वेगळा होता. कारण त्यामध्ये नेम फेम तर होतं पण शांती आणि आत्मसंतुष्टी नव्हती. यासाठी तो प्रवास सोडून आता मी अध्यात्माच्या प्रवासावर जाण्याचा विचार केला आहे. कारण, या प्रवासात जो आनंद मिळतो, सनातन धर्म आणि लोकांची सेवा करून. त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही आनंदाशी केली जाऊ शकत नाही.
इशिका तनेजाने २०१७ मध्ये मिस वर्ल्ड टुरिझम इंडियाचा किताब जिंकला आहे. २०१८ मध्ये मलेशियाच्या मेलाकामध्ये आयोजित मिस वर्ल्ड टुरिझममध्ये तिला बिझनेस वुमन ऑफ द वर्ल्डचे किताब देखील मिळवले. इशिकाने इंदू सरकार, हद, दिल मंगदी यासारख्या चित्रपटामध्ये काम केलं आहे.