पुढारी ऑनलाईन डेस्क - इंडियाज गॉट लॅटेंट केस प्रकरणी सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अपुर्वा मखिजाने आज खार पोलीस ठाण्यात हजर झाली. यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर अपूर्वा मखिजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लॅटेंट शोच्या आयोजकांविरुद्ध शोमध्ये अपमानास्पद आणि असभ्य भाषा वापरल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
स्टँडअप कॉमेडियन समय रैना याचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. महाराष्ट्र सायबर सेलने यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, समय रैना, शोचे निमति बलराज घई आणि अन्य चाळीस जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. शोच्या पहिल्या एपिसोडपासून ते सहाव्या एपिसोडपर्यंतचे सर्व होस्ट आणि पाहुण्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शोच्या शेवटच्या भागामध्ये यूट्यूवर रणवीर अलाहाबादियाने हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणावरून रणवीरसह समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट शोचे निमति बलराज घई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सध्या रणवीरच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी एफआयआरदेखील दाखल करण्यात आले आहेत. रणवीरने वक्तव्यावर माफी मागून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, फैजान अन्सारी या एन्फ्ल्यूएन्सरने यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने घृणास्पद वक्तव्य केले आहे. मी तिथे असतो तर त्याची जीभ कापली असती. देशातील कोणत्याही व्यक्तीने अलाहाबादियाची जीभ छाटून मला आणून दिली तर मी त्याला मी पाच लाख रुपये बक्षीस म्हणून देईन. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.