मुंबई : बॉलीवूडमधून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. 'लगान', 'गजनी', 'इन्साफ' आणि 'छावा' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. प्रदीप रावत यांच्या निधनाची माहिती त्यांचे 'लगान' चित्रपटातील सहकलाकार यशपाल शर्मा यांनी दिली आहे.
'गजनी'फेम अभिनेत्याच्या निधनाची माहिती देताना यशपाल शर्मा यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले, "प्रदीप रावत... आपले गजनी आणि लगानमधील देवा, ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो." मात्र, यशपाल शर्मा यांनी त्यांच्या निधनाचे कारण स्पष्ट केलेले नाही. या पोस्टमुळे प्रदीप रावत यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
याशिवाय, अभिनेता सोनू सूदनेही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत लिहिले, "ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो प्रदीप भाई... तुमची खूप आठवण येईल," अशी भावना व्यक्त केली आहे.
एका युझरने लिहिले, "हे देवा, हे कसे घडले? ते आजारी होते का? ही अत्यंत हृदयद्रावक बातमी आहे." दुसऱ्या एका युझरने लिहिले, "भावपूर्ण श्रद्धांजली सर! तुम्ही महाभारतात साकारलेली 'अश्वत्थामा', लगानमधील 'देवा सिंग सोडी' आणि गजनीमधील खलनायकाची भूमिका, या सर्व आमच्या अत्यंत आवडत्या भूमिका आहेत. आम्ही तुम्हाला खूप मिस करू." तर अन्य एका युझरने "अत्यंत दुःखद बातमी! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.