पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज बुधवारी वाशी येथे 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) उपस्थित होता. यावेळी जॉनने त्याच्या जीवनशैलीबाबत मोठा खुलासा केला. "मी माझ्या आयुष्यात कधीही ड्रग्जला हात लावला नाही. स्मोकिंगही कधी केले नाही. मी मद्यपानही करत नाही. आयुष्यात शिस्त पाळा आणि तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी रोल मॉडेल बना. चांगले नागरिक व्हा." असा संदेश जॉनने या कार्यक्रमातून दिला.
अभिनेता जॉन अब्राहम पुढे म्हणाला, "या उपक्रमाबद्दल मी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रासाठी आणि नवी मुंबईतील तरुणांसाठी हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे."
"जॉन अब्राहम शांत का आहे? कारण तो ड्रग्जला नाही म्हणतो." असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सोशल मीडियाकडे आजकाल एक नवीन बाजारपेठ म्हणून पाहिले जात आहे. जेव्हा आपण डग्ज तस्करांवर कारवाई करतो; तेव्हा ते ड्रग्ज तस्करीसाठी सोशल मीडिया आणि कुरिअर सेवेचा वापर करतात. ड्रग पेडलर आता नवीन मार्गांचा अवलंब करत आहेत. पण तरीही पोलिस आणि राज्य प्रशासनही त्यांच्यावर कठोर कारवाई करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले, "ड्रग्जबद्दलच्या झिरो टोलरन्स धोरणाचा एक भाग म्हणून नवी मुंबईने 'ड्रग फ्री फॉरेव्हर नवी मुंबई' ही मोठी मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही याबाबत अनेक उपक्रम राबवू. ड्रग तस्करांवर कारवाई केली जाईल. या अभियानाला लोकांनी सहकार्य करावे." असे आवाहन त्यांनी केले.