Pakistani Actress Humaira Asgar Pudhari
मनोरंजन

Pakistani Actress: दुर्दैवी ! अभिनेत्रीचा नऊ महिने मृतदेह घरातच पडून; वडिलांनी दिला अंत्यसंस्कार करण्यास नकार

पाकिस्तानी अभिनेत्री हुमेरा असगर हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले तिच्या कराचीतील अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह आढळून आला

अमृता चौगुले

पाकिस्तानी अभिनेत्री हुमेरा असगर हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तिच्या कराचीतील अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. दुर्दैवाची बाब म्हणजे हुमेराचा मृतदेह जवळपास 9 महीने तिच्या घरातच पडून होता. अत्यंत खराब अवस्थेत पोलिसांना तिचा मृतदेह आढळून आला. बरेच दिवस फ्लॅटचे भाडे चुकवल्याने घरमालकाने तिच्यावर कायदेशीर भूमिका घेतली होती.त्या संदर्भात संबंधित अधिकारी घरी आल्यावर तिच्या मृत्यूची बातमी समजली.

कुणालाच कसा संशय नाही आला?

नऊ महीने मृतदेह घरात असूनही कुणालाच कसा काय संशय आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ज्या अपार्टमेंटमध्ये ती रहात होती त्या मजल्यावर कोणीच रहात नव्हते. याशिवाय बाल्कनीचा एक दरवाजाही उघडा होता.

फेब्रुवारीमध्ये रहिवासी राहायला येईपर्यंत सगळा दुर्गंध निघून गेला होता. तसेच हुमेराच्या घरातील साहित्य, अन्नपदार्थ जवळपास सहा महीन्यापूर्वीचे असल्याचे दिसून येत होते.

घरात वीजही नव्हती

वीजबिल थकल्याने तिच्या घराची वीज ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केली होती. पण तिचे कॉल रेकॉर्डिंग, सोशल मिडियावरील अॅक्टिविटी आणि इतर काही गोष्टीवरून तिचा मृत्यू नऊ महिन्यांपूर्वीच झाल्याचे समोर येत आहे. वीज कनेक्शन बंद केल्याच्या आसपासच तिचा मृत्यू झाला असावा. कारण तिच्या घरात मेणबत्ती सापडली नाही.

कॉल रेकॉर्डनुसार इतर तिच्या मोबाइलवरुन शेवटचा फोन ऑक्टोबर 2024 मध्ये केला गेला होता. तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सप्टेंबर 2024 मध्ये केली गेली होती.

मृतदेह ताब्यात घेण्यास वडिलांचा नकार

हुमेराचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर पोलिसांनी तिच्या घरच्यांना कळवले असता त्यांची प्रतिक्रिया चकित करणारी होती. हुमेराचे वडील म्हणाले, की आम्ही तिच्यासोबतचे सर्व संबंध आधीच तोडले होते. तिचा आमचा आता काही संबंध नाही. तिच्या मृतदेहाबाबत जे योग्य आहे ते करा. आम्ही तो ताब्यात घेणार नाही.

अभिनेत्रीने व्यक्त केला राग

अभिनेत्री मनशा पाशा हिने हुमेराच्या वडिलांच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. इंस्टा स्टोरी शेयर करत ती म्हणते, हे खूप भयानक आहे. पालकांचे कर्तव्य आहे की आपल्या मुलांच्या चुकीला मोठ्या मनाने माफ करावे. जरी त्यांच्यात कितीही मतभेद असले तरी.. दुर्दैवाने समाज, लोक घरातील महिलांना कधीच माफ करत नाहीत, मेल्यानंतरही नाही.. अत्यंत लाजिरवाने. याशिवाय मावरा होकेन आणि हिना अल्ताफ यांनीही हुमेराच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT