ममताची महामंडलेश्वर कशी झाली? Pudhari
मनोरंजन

ममताची महामंडलेश्वर कशी झाली?

शांभवी पीठाधीश्वरांकडून टीका; आखाडा परिषदेचे समर्थन

पुढारी वृत्तसेवा

प्रयाग : अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाल्यानंतर यावरून नवा वाद सुरू झाला आहे. किन्नर आखाड्याला मान्यता देऊन गेल्या कुंभात महापाप झाले, असा ठपका शांभवी पीठाचे पीठाधीश्वर श्री स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी लावला, तर आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी मात्र ममताजींनी महामंडलेश्वराचे खऱ्या अर्थाने पालन केले तर आपली आध्यात्मिक परंपरा संपूर्ण देशात सर्वोच्च शिखरावर पोहोचेल, असे नमूद केले.

जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी म्हणतात की, प्रत्येकाला संन्यास करण्याचा अधिकार आहे. ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर करण्यात आल्यावर शांभवी पीठाधीश्वर श्री स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. गेल्या कुंभात किन्नर आखाड्याला मान्यता देऊन मोठे पाप केले गेले, हा प्रकार अत्यंत घातक आहे. हा सनातन धर्माशी केलेला विश्वासघात आणि फसवणूक आहे, असे ते म्हणाले.

यापूर्वी ममता कुलकर्णी ड्रग्जच्या आरोपांनी घेरल्या असल्याच्या प्रश्नावर रवींद्र पुरी म्हणाले, पूर्वी त्या कशा होत्या हे जाणून घेण्याची गरज नाही. यापूर्वी त्यांच्यावर जे काही आरोप झाले ते सिद्ध होऊ शकले नाहीत. आजकाल आरोप करणे खूप सोपे झाले आहे. हा एक ट्रेंड बनला आहे

थेट महामंडलेश्वर बनवण्याची परंपरा नाही

जेव्हा एखादा आखाडा पूर्णपणे तयार होतो, तेव्हा त्यांना महंत, साध्वी किंवा महामंडलेश्वर बनवण्याची ताकद असते. तो कोणताही निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे, असे जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते नारायण गिरीजी महाराज म्हणाले, महामंडलेश्वर होण्याची प्रक्रिया काय आहे? या प्रश्नावर ते म्हणाले- आखाड्यात सर्वप्रथम एक महापुरुष, अवधूत, महंत श्री महंत तयार होतात. मग त्या व्यक्तीने राष्ट्रात धर्मप्रस रासाठी किती योगदान दिले, किती काम केले हे आखाडा पाहतो. त्या आधारेच पुढील निर्णय घेतले जातात. कोणीतरी येतो, संन्यासी बनण्याची घोषणा करतो आणि आपण त्याला थेट महामंडलेश्वर बनवतो, ही जुना आखाड्याची परंपरा नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT