पुढारी ऑनलाईन डेस्क : लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांचा चित्रपट ‘मु.पो. बोंबिलवाडी’चे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात हिटलर व चर्चिलच्या भूमिका कोण बजावणार याबद्दल रसिकांमध्ये कुतूहल होते. हिटलरच्या भूमिकेत अभिनेता प्रशांत दामले झळकणार हे स्पष्ट झाले आहे. तर चर्चिलच्या भूमिकेत आनंद इंगळे दिसणार आहेत. निर्मात्यांनी आज ‘मु.पो.बोंबिलवाडी’ चे पोस्टर प्रदर्शित केले.
हा चित्रपट १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. परेश आणि मधुगंधा यांनी त्यांच्या ‘मु.पो.बोंबिलवाडी- १९४२ एका बॉम्बची बोंब’ची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केली होती.
चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रदर्शित केलेल्या मोशन पोस्टरवरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, हा अंदाज येतो. आज प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरच्या माध्यमातून नवनवीन पात्रे रसिकांसामोरे येतात. या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळी यांची आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजेलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना परेश मोकाशी म्हणाले, “मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक लोकांना इतके आवडले की तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता! ‘बोंबिलवाडी’सारख्या छोट्या गावात इंटरनॅशनल घटना घडतात आणि त्यावर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा निकाल लागतो ही फार्सिकल गोष्ट आजही तितकाच व्यायाम देईल फुप्फुसांना!”
चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच इतर कसलेले कलाकार चित्रपटात आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचे अभिनय उत्तम झाले आहेत. ही एक धमाल लाफ्टर राईड झाली आहे.”