अभिनयातून निवृत्ती घेत असल्याच्या निर्णयावर २४ तासांनंतर विक्रांत मेसीने खुलासा केला आहे. (Image source- Vikrant Massey instagram)
मनोरंजन

अभिनयातून निवृत्ती नाही! २४ तासांनंतर 12th Fail फेम विक्रांत मेसीचा यू-टर्न

Vikrant Massey | 'माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला गेला'

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : 12th Fail फेम अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey) याच्या अभिनयातून निवृत्ती घेत असल्याच्या निर्णयाने सोमवारी अनेकांना धक्का बसला. विक्रांत मेसीने सोमवारी सकाळी जाहीर केले होते की २०२५ मध्ये त्याचे शेवटचे दोन चित्रपट लोकांना पाहायला मिळतील. त्याने कुटुंबासाठी वेळ देण्यासाठी त्याच्या घरी परतणार असल्याची घोषणा केली होती. लोकांना असे वाटले की विक्रांत मेसीने वयाच्या ३७ व्या वर्षी निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयामुळे इंटरनेटवर प्रचंड खळबळ उडाली होती. त्याच्या या निर्णयाचे काहींनी समर्थन केले, तर काहींनी त्याच्यावर टीकाही केली. दरम्यान, मेसीने आता २४ तासांनंतर खुलासा केला आहे. आपण अभिनयातून निवृत्ती घेतलेली नाही. त्याला जे काही सांगायचे होते; त्याचा लोकांनी चुकीचा समज काढला, असे मेसीने म्हटले आहे.

विक्रांत मेसीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, "मी केवळ अभिनयच करू शकतो आणि माझ्याकडे जे काही आहे ते मला अभिनयानेच दिले आहे. माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मोठा फटका बसला आहे. मला केवळ थोडा वेळ काढायचा आहे. मला माझी कला अधिक चांगली करायची आहे. मला या क्षणी तोचतोचपणा वाटतो. मी अभिनय सोडत आहे अथ‍वा अभिनयातून निवृत्त होत आहे, या माझ्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावला गेला. मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थोडा वेळ काढायचा आहे. जेव्हा योग्य वेळ वाटेल; तेव्हा मी परत येईन."

विक्रांत मेसीच्या 'या' पोस्टने अनेकांना धक्का

"हॅलो, गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्षे अभूतपूर्व राहिली. तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण जसजसे मी पुढे जात आहे, तसतशी मला एक पती, वडील आणि मुलगा आणि अभिनेता म्हणून जाणीव होत आहे की पुनर्प्राप्ती करण्याची आणि घरी परत जाण्याची आता हीच वेळ आहे. २०२५ मध्ये आम्ही एकमेकांना शेवटचे भेटू. गेल्या २ चित्रपटांच्या आणि अनेक वर्षांच्या आठवणी आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. प्रत्येक गोष्टीसाठी आणि मधल्या काळातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कायमची ऋणी राहीन." असे त्याने सोमवारच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

'द साबरमती रिपोर्ट'मधील त्याची सहकलाकार राशी खन्ना हिला त्याच्या या निर्णयाचा धक्का बसला होता. तर दिया मिर्झाने त्याच्या पोस्टवर त्याचे कौतुक करून आणि त्याच्या निर्णयाचे समर्थन केले. ''ब्रेक सर्वोत्तम आहे. तुम्हाला दुसऱ्या बाजूने आणखी अत्यंत आश्चर्यचकित वाटेल." असे दिव्याने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी अभिनेता विक्रांत मेसीचा 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) हा चित्रपट २ डिसेंबर रोजी संसदेत पाहिला. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर पीएम मोदी यांनी चित्रपट निर्मात्यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT