Hemant Dhome Statement Pudhari
मनोरंजन

Hemant Dhome: काही सेटवर कलाकारांना चहा आणि नाश्ता पण...; हेमंत ढोमेचा संताप, नेमकं काय म्हणाला?

Hemant Dhome Statement: अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी कलाकारांच्या कामाच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मूलभूत सुविधा नसतील तर काम बंद करण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

पुढारी वृत्तसेवा

Hemant Dhome Statement: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी कलाकारांच्या कामाच्या परिस्थितीबाबत अतिशय स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी इंडस्ट्रीतील कामगार आणि कलाकारांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले हेमंत ढोमे?

‘छापा काटा’ या पॉडकास्टमध्ये बोलताना हेमंत ढोमे म्हणाले की, आता तर अशी परिस्थिती आहे की कलाकारांना रस्त्यावर कपडे बदलावे लागत आहेत, त्यांना नीट जेवण मिळत नाही, अगदी सकाळचा नाश्ताही मिळत नाही.

काही चित्रपटांचे असेही सेट आहेत जिथे दिवसातून तीनदाच चहा मिळतो. सकाळी एक-दोन कप आणि संध्याकाळी एक कप चहा, दे की चहा त्यांना... चहा दूध पाणी साखर आणि चहा पावडर, फार तर फार आलं किंवा काय जे काय त्याच्यात टाकायचा असेल ते... हे उकळून द्यायला दिवसभर प्रॉब्लेम काय आहे? एखाद्याला चहा प्यायचा आहे. दिवसातून दहा वेळा चहा पिऊ देत... ठेवा ना तुम्ही चहा, बिस्किट बुडवून खाऊ दे ना त्याला.. चहा दिल्यावर असा काय फरक पडणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर कलाकारांना नऊच्या शिफ्टला येताना स्वतःच नाश्ता करून या असं सांगितलं जात असेल, तर ती चुकीची पद्धत आहे.”

ढोमे यांनी सांगितले की, चित्रपट किंवा नाटक बनवताना केवळ प्रोजेक्ट पूर्ण करणे महत्त्वाचे नसते, तर त्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे अधिक गरजेचं आहे. कलाकार, तंत्रज्ञ आणि क्रू यांना किमान सुविधा मिळणं ही मूलभूत जबाबदारी आहे. कामाच्या ठिकाणी सन्मान आणि सुरक्षितता असणं अत्यावश्यक आहे.

“त्या दिवशी दुकान बंद करेन…”

ढोमे म्हणाले की “ज्या दिवशी अशी परिस्थिती येईल, त्या दिवशी मी हे दुकान बंद करेन.” यातून त्यांनी स्पष्ट केले की, कामापेक्षा काम करणाऱ्यांचा सन्मान त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे. हेमंत ढोमे यांच्या या विधानाकडे केवळ वैयक्तिक मत म्हणून पाहता येणार नाही.

मराठी आणि इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीत अनेकदा कमी बजेटमुळे कलाकारांना सुविधा मिळत नाहीत. याचा थेट परिणाम कलाकारांच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या मानसिक-शारीरिक आरोग्यावर होतो. ढोमे यांनी याच मुद्द्यावर थेट बोट ठेवलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT