सिनेसृष्टीत कोणाची कधी मैत्री होईल आणि कोणाचे कधी भांडण होईल, याचा काही नेम नाही. अशातच लोकप्रिय कॉमेडीयन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा अभिनेता गोविंदा यांच्यातील भांडण सुमारे सात वर्षांनी मिटले असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्यातील वादाची चर्चा खूपच रंगली. मात्र, काही दिवसांपूर्वी घरीच पिस्तूल साफ करत असताना अनवधानाने गोळी सुटली आणि ती गोळी गोविंदा याच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला होता.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तो बरा व्हावा, यासाठी अनेकांनी प्रार्थनाही केल्या. त्याचवेळी गोविंदा व त्याचा भाचा कृष्णा अभिषेकलाही मामाच्या प्रकृतीची काळजी वाटत होती, घटना घडली त्यावेळी कृष्णा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात होता. मात्र, त्याची पत्नी कश्मिरा शाह बातमी समजताच गोविंदाला भेटायला गेली होती. गोविंदा यांच्या घरी पोहोचल्यानंतर कृष्णाने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, मामाबरोबर जी दुर्घटना घडली, त्यावेळी मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो. मी माझा दौरा रद्द करणार होतो. पण, रुग्णालयातील कर्मचारी व कश्मिराबरोबर बोललो. त्यावेळी सर्व काही ठीक असल्याचे सांगण्यात आले. मी भारतात आल्यानंतर सात वर्षांत पहिल्यांदाच मामाच्या घरी गेलो. मी माझा अर्धा वनवास पूर्ण केला असल्याचे वाटले.