गेला उडत चित्रपट 
मनोरंजन

श्रद्धा आणि आत्मविश्वासाची अनोखी कहाणी- ‘गेला उडत’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण हवेत उडू शकतो असं जर कुणी म्हटलं तर? आपला साहजिकच त्याच्यावर विश्वास बसणार नाही! किंवा मग आपण विचारू की विमानातून की रॉकेटमधून? पण या कोणत्याही साधना शिवाय आपण हवेत उडू शकतो असं कुणी म्हटलं तर? जसे हनुमंत रामायणात सीतामाईच्या शोधासाठी उडत गेले होते तसंच? असं घडलं तर नेमकं काय होईल हेच दाखवण्यासाठी एका आगळ्या-वेगळ्या कथनकासह एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय… 'गेला उडत'!

एका मध्यमवर्गीय व्यक्तीभोवती हे कथानक गुंफलेलं आहे. गरिबीचे चटके, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या, आपल्याच कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या, त्या पूर्ण करण्यात सातत्याने येणारं अपयश यामुळे चित्रपटातल्या मुख्य पात्राचं आयुष्य ग्रस्त असतं. पण भगवान हनुमान अर्थात त्याच्या हनुमंतावर त्याची प्रचंड श्रद्धा असते. या श्रद्धेतून एक दिवस तो अचानक म्हणतो मी उडू शकतो! आधी त्याच्यावर साहजिकच विश्वास न ठेवणारी माणसं हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात खरे. पण त्याला उडताना मात्र कुणीच पाहिलेलं नाही. शेवटी एकतर आम्हाला हवेत उडून दाखव, नाहीतर परिणामांना तयार राहा असा इशाराच जेव्हा त्याला आसपासची मंडळी देतात, तेव्हा मात्र कसोटीचा क्षण उभा ठाकतो. या प्रश्नाचं उत्तर तो कसं शोधतो? तो खरंच उडू शकतो का? हे पाहण्यासाठी २५ ऑगस्ट रोजीची प्रतीक्षा करावी लागेल.

मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत 'गेला उडत' या चित्रपटाची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथेसह दिग्दर्शनही मुन्नावर शमीम भगत यांचंच आहे. रफिक शेख यांनी संगीत दिलं असून पार्श्वगायन सलिल अमृते यांचं आहे. मकरंद पाध्ये, ज्योत्स्ना राजे गायकवाड, प्रसाद माळी, शालवी शाह, किसन खंदारे यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अंधश्रद्धा बऱ्याचदा नुकसान करणाऱ्या जरी असल्या, तरी अनेकदा त्यामुळे काही आयुष्यं पूर्णपणे बदलून जातात. अशाच एका बदललेल्या आयुष्याची कथा 'गेला उडत' चित्रपट आपल्यासमोर उभी करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT