अभिनेत्री गौतमी कपूर हिने एका पॉडकास्टमध्ये पालकत्वाबाबत केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तिने आपल्या मुलीशी लैंगिक विषयांवर खुलेपणाने संवाद साधल्याचे सांगितले होते. या विधानानंतर तिला तीव्र ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. चार महिन्यांपूर्वी गौतमी एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा मुलगी वयात आल्यानंतर तिला सेक्स टॉय देईन, अशा अर्थाचे विधान तिने केले होते. हे विधान व्हायरल झाले होते. अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या विचारांवर टीका केली. काहींनी त्यांच्या पेरेंटिंग पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या.
त्यानंतर नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना गौतमी म्हणाली की, हा वाद पूर्णपणे अनपेक्षित;अनेक महिन्यांपूर्वी दिलेले विधान अचानक पुन्हा समोर आणले गेले. सोशल मीडियावरील टिप्पण्या अत्यंत दुखावणार्या होत्या. या सगळ्या प्रकारामुळे रात्री झोप येईनाशी झाली होती. मानसिक तणावात गेले होते. जवळपास एक महिना इन्स्टाग्रामपासून दूर राहिले. कुणावरही विचार लादले नाहीत. हे वैयक्तिक मत होते. प्रत्येक पालकाची पेरेंटिंग पद्धत वेगळी असू शकते.
काही लोक सहमत होतील, काही नसतील हे स्वाभाविक आहे. त्यांनी हेही सांगितले की, त्यांचे आणि पती राम कपूर यांचे मुलांशी खुले आणि प्रामाणिक नाते आहे आणि ते दोघेही आपल्या मुलांशी संवाद महत्त्वाचा मानतात. गौतमी कपूर या अभिनेता राम कपूर यांच्या पत्नी असून, त्या स्वतःही टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. यावर्षी त्या ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटात झळकल्या होत्या. तसेच त्या आर्यन खानच्या आगामी वेब सीरिजमध्येही दिसल्या आहेत.